प्रयागराज येथे महाकुंभमेळा पार पडल्यानंतर आता नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेध लागले आहेत. 31 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 2 मिनिटांच्या अभिजात मुहूर्तावर ध्वजारोहण होणार आहे. यानंतर खऱ्या अर्थाने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरूवात होणार आहे. नाशिकमध्ये 2026 ते 2028 या वर्षांमधील 22 महिन्यांच्या कालावधील कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि रामकुंड येथे अमृतस्नान होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे शैव, तर रामकुंड येथे वैष्णव आखाडे अमृतस्नान करतील 12 वर्षानंतर नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे. पण हे 12 वर्षांचं गणित कसं असतं? नाशिकमधील कुंभमेळ्याला सिंहस्थ हा संबोधलं जातं? खगोलीय आणि ज्योतिषीय गणित काय आहे? असे सर्व प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय राहात नाही.
गुरू ग्रह आणि सिंह राशीचं महत्त्व
सिंहस्थ कुंभमेळा हा प्रामुख्याने गुरु ग्रहाच्या गोचर स्थितीवर अवलंबून आहे. गोचर स्थिती म्हणजे ग्रहाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याची स्थिती... प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी ठरला आहे. गुरू ग्रहाचा गोचर कालावधी हा एका वर्षांचा आहे. गुरू ग्रहाच्या सिंह राशीतील प्रवेशानंतर नाशिकमधील कुंभमेळ्याचं आयोजन ठरतं. ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी आहेत. प्रत्येक राशीत गुरू ग्रहाला पुन्हा येण्यासाठी 12 वर्षांचा कालावधी लागतो. म्हणजेच एका राशीत गुरू ग्रह एक वर्ष ठाण मांडून बसतो. तसेच गुरुला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे 12 वर्षे लागतात.ज्योतिषशास्त्रानसुार, गुरू ग्रह 12 वर्षानंतर जेव्हा सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन होतं. म्हणून नाशिकमधील कुंभमेळ्याला सिंहस्थ कुंभमेळा असं संबोधलं जातं.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये गेल्या वर्षी महाकुंभ सोहळा पार पडला. या कुंभमेळ्यात जवळपास 66 कोटी भाविकांनी श्रद्धेच्या पवित्र संगमात डुबकी मारली. 13 ...
अमृत्नस्नानाचं ज्योतिषीय गणित कसं ठरतं?
ज्योतिषशास्त्रानुसार,गुरु सिंह राशीत 0 ते 30 अंशाच्या दरम्यान असतो, तेव्हा सिंहस्थ पर्व सुरू होते. गुरुसोबत सूर्य देखील सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. सूर्याच्या सिंह राशीतील प्रवेशाला सिंह संक्रांत संबोधलं जातं. सूर्य, चंद्र आणि गुरु हे सर्व सिंह राशीत एकत्र आल्यावर मुख्य पर्वणी साधली जाते.
पहिले अमृत स्नान (2 ऑगस्ट 2027 - सोमवती अमावस्या): या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही कर्क/सिंह राशीच्या संधीवर असतील. सोमवार आणि अमावस्या एकत्र आल्याने 'सोमवती अमावस्या' हा अत्यंत पवित्र पितृ आणि देव कार्याचा योग बनेल.
दुसरे मुख्य अमृत स्नान (31 ऑगस्ट 2027 - श्रावण अमावस्या): या दिवशी सूर्य, चंद्र आणि गुरु हे तिन्ही ग्रह सिंह राशीत एकत्र येतील. या त्रिग्रही युतीमुळे गोदावरीच्या रामकुंडातील आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्तातील स्नानाला 'महाकुंभ स्नान' केलं जाईल. कारण चंद्र अमृताचे रक्षण करतो आणि सूर्य व गुरु आत्मिक शुद्धी देतात.
तिसरे अमृत स्नान (11 आणि 12 सप्टेंबर 2027 ): या दिवशी चंद्र धनु/मकर राशीत असेल आणि गुरु-सूर्यावर त्याची शुभ दृष्टी असेल. हा विष्णू उपासक (वैष्णव) आणि शिव उपासक (शैव) साधूंसाठी स्वतंत्रपणे पर्वणी योग घडवून आणेल. वैष्णव आखाडे 11 सप्टेंबरला, तर शैव आखाडे 12 सप्टेंबरला अमृतस्नान करतील.