Monday, October 26, 2026

Nashik : रामकुंडाकडे वाहनांना नो एंट्री ! ​ सिंहस्थपूर्व धार्मिक सोहळ्यांसाठी वाहतुकीत मोठे बदल; ३० आणि ३१ ऑक्टोबरला अनेक मार्ग बंद

दोन्ही दिवसांसाठी अधिसूचनेत नमूद केलेले बंद मार्ग, नो-पार्किंग क्षेत्रे आणि पादचारी मार्गांवर वाहतुकीचे विशेष निर्बंध लागू राहतील. संबंधित क्षेत्रे नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मात्र, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि पोलीस वाहने यांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून नाशिकमध्ये धर्मध्वज मिरवणूक, ध्वजारोहण सोहळा आणि गोदा आरती या महत्त्वाच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी साधू-महंत, व्हीव्हीआयपी आणि भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहर वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी शहरातील मध्यवर्ती भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, काही भाग नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

रामकुंड आणि गोदावरी नदीच्या घाट परिसरात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांसह शहरात येणाऱ्या भाविकांनी प्रवासापूर्वी वाहतुकीचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ आणि मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांनी नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

३० ऑक्टोबरला धर्मध्वज मिरवणूक; या मार्गांवर वाहतूक बंद

शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून धर्मध्वज मिरवणूक संपेपर्यंत मिरवणुकीच्या मार्गावर वाहतुकीचे निर्बंध लागू राहतील. मिरवणुकीत सहभागी वाहनांना नियमानुसार सूट असेल.

धर्मध्वज मिरवणुकीचा मार्ग :

तपोवन मैदान → आठवण लॉन्स → टी कॉर्नर → तपोवन क्रॉसिंग → पंचमुखी हनुमान मंदिर → काट्या मारुती चौक → देवी चौक (अमरधाम रोड) → गणेशवाडी → फुल बाजार → गाडगे महाराज पूल → दिल्ली दरवाजा → नेहरू चौक → धुमाळ पॉईंट → मेनरोड → रविवार कारंजा → अहिल्याबाई होळकर पूल → मालेगाव स्टँड → रामकुंड.

या मार्गांवरही वाहतुकीस बंदी असेल :

- अशोक स्तंभ ते रविवार कारंजा

- रेडक्रॉस ते धुमाळ पॉईंट

- मालेगाव स्टँड ते मखमलाबाद नाका

- दिंडोरी नाका ते मालेगाव स्टँड

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग

वरील मार्गांवरील वाहतूक निर्बंधांमुळे वाहनचालकांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा :

दिंडोरी नाका → पेठ नाका सिग्नल → मखमलाबाद नाका → गोदा पार्क → गजभिये पेट्रोल पंप.

३१ ऑक्टोबरला ध्वजारोहण आणि गोदा आरती; रामकुंड परिसरात प्रवेशबंदी

शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहण सोहळा आणि गोदा आरतीच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरातील वाहतुकीवर व्यापक निर्बंध लागू असतील. सकाळी ६ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत रामकुंडाकडे जाणारे सर्व मार्ग नागरिक आणि वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

प्रमुख बंद मार्ग पुढीलप्रमाणे :

- अशोक स्तंभ ते रविवार कारंजा, अहिल्यादेवी होळकर पूल, मालेगाव स्टँड, इंद्रकुंड आणि पंचवटी कारंजा.

- मखमलाबाद नाका ते रामकुंड आणि कपालेश्वर मंदिर परिसर.

- गाडगे महाराज पूल आणि रामसेतू पूल.

या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा. कार्यक्रमस्थळाच्या आसपास गर्दी होण्याची शक्यता असल्याने शक्यतो खासगी वाहनांऐवजी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रामकुंड परिसर नो व्हेईकल झोन; आपत्कालीन वाहनांना सूट

दोन्ही दिवसांसाठी अधिसूचनेत नमूद केलेले बंद मार्ग, नो-पार्किंग क्षेत्रे आणि पादचारी मार्गांवर वाहतुकीचे विशेष निर्बंध लागू राहतील. संबंधित क्षेत्रे नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मात्र, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि पोलीस वाहने यांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.

भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था कुठे ?

धार्मिक कार्यक्रमांसाठी शहरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पंचवटी आणि भद्रकाली परिसरात वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत.

पंचवटी परिसरातील पार्किंग :

- शिंदे मळा

- श्रद्धा लॉन्स

- गौरी पटांगण

भद्रकाली परिसरातील पार्किंग :

- छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम

- बी.डी. भालेकर मैदान

- संभाजी महाराज गार्डन

भाविकांनी आपली वाहने निर्धारित वाहनतळांवरच उभी करावीत आणि बंद मार्गांवर पार्किंग करणे टाळावे.

नाशिककरांनी प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीतील धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी नाशिकच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः पंचवटी, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड आणि रामकुंड परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी वाहतूक बदलांची नोंद घ्यावी. धर्मध्वज मिरवणूक, ध्वजारोहण आणि गोदा आरती निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >