गोदावरी प्रदूषण नियंत्रण; क्रोमियम कंपन्यांवर कारवाईचे आदेश आणि आयुक्तांच्या महत्त्वाच्या सूचना
नाशिकमध्ये गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कालबद्ध उपाययोजनांचे निर्देश दिले. क्रोमियम उत्सर्जित करणाऱ्या कंपन्यांची महिनाभरात 100 टक्के तपासणी, भूजल प्रदूषणाची व्याप्ती निश्चित करणे आणि सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
October 28, 2026 08:47 PM
नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम
1/5 नाशिकमधील गोदावरी नदीचे प्रदूषण रोखून नदीत पर्यावरणपूरक जलप्रवाह कायम राखण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि कालबद्ध पद्धतीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची नियमित तपासणी करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
2/5 नाशिक शहरातील अंबडसह काही भागांतील बोअरवेलच्या पाण्यात क्रोमियमचे प्रमाण आढळून आल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. क्रोमियम उत्सर्जित करणाऱ्या कंपन्यांची महिनाभरात शंभर टक्के तपासणी पूर्ण करण्याचे आणि प्रदूषणाची व्याप्ती निश्चित करून प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
3/5 दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला असल्याची शक्यता तपासण्यासाठी महानगरपालिकेने बाधित भागांत विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. तसेच नागरिकांचे आरोग्य परीक्षण करून क्रोमियमसह इतर जड धातूंच्या प्रदूषकांचीही कसून तपासणी करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
4/5 गोदावरी व तिच्या उपनद्यांमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांमध्ये सुधारणा करावी. तसेच वाढत्या गरजेनुसार नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत महानगरपालिकेने तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले.
5/5 बंदी असलेल्या पॉलिथिन पिशव्यांची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आणि कापडी पिशव्यांच्या निर्मितीसाठी महिला बचतगटांना सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच रामकुंड परिसरातील रामकाल पथ विकसित करताना पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यावर भर दिला गेला.