Wednesday, October 28, 2026

नाशिक ग्रामीण भागात 30 आणि 31 ऑक्टोबरला 'नो ड्रोन' अन् 'पॅराग्लायडिंग झोन'; सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण भागात 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी ड्रोन उड्डाण आणि पॅराग्लायडिंगवर निर्बंध लागू करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. या आदेशाचा नेमका परिसर आणि लागू अटी जाणून घ्या.

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा भाग म्हणून नाशिक ग्रामीण पोलीस क्षेत्राच्या हद्दीत 30 आणि 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत 'नो ड्रोन' आणि 'नो पॅराग्लायडिंग झोन' घोषित करण्यात आला आहे. या काळात सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय ड्रोन उडवण्यास किंवा पॅराग्लायडिंग करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाचा भव्य सोहळा नाशिकमध्ये पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशाच्या महामहिम राष्ट्रपती आणि राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (VIPs), लोकप्रतिनिधी आणि देशभरातून लाखो नागरिक व भाविक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.

मोठ्या संख्येने होणारी गर्दी आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची सुरक्षेची त्रुटी राहू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दोन दिवसांसाठी संपूर्ण नाशिक ग्रामीण जिल्हा क्षेत्रात ही बंदी लागू राहील.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आदेशाचा भंग करून पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन किंवा पॅराग्लायडर वापरणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिक आणि भाविकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >