मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी पाच वर्षांपूर्वी ज्या जागांवर भाजप नव्हता, त्यापैकी दोन जागा पक्षाने जिंकल्या आहेत. नागपूरची जागा काँग्रेसने स्वतःच्या ताकदीवर नव्हे, तर अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्या द्वितीय पसंतीच्या मतांमुळे जिंकली आहे, असे सांगत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसच्या विजयाच्या जल्लोषावर टीका केली. महायुतीत शकुनी मामा आहेत का, हे तपासण्याची वेळ आली आहे. निवडणुकीतील कामगिरीचे विश्लेषण आणि आत्मपरीक्षण केल्यानंतर संबंधितांबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.(NITESH RANE)
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, “पाच वर्षांपूर्वी ज्या जागांवर आम्ही आज जिंकलो, त्या जागांवर भाजपचा उमेदवारही नव्हता. तिथून आम्ही दोन जागा जिंकल्या आहेत. महायुती म्हणून आम्ही एकदिलाने आणि एकत्र लढलो असतो, तर चित्र आणखी स्पष्ट झाले असते. विधानसभा निवडणुकीत आम्ही एक ताकद म्हणून लढलो, हिंदुत्वाचा विषय घेऊन लढलो आणि त्याचा परिणाम दिसला. महायुतीची ताकद मित्रपक्षांनी समजून घेतली पाहिजे.”
नागपूरच्या निकालावर बोलताना ते म्हणाले, “पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आमचा उमेदवार साडेचार हजार मतांनी पुढे होता. नितेश कराळे यांच्या द्वितीय पसंतीच्या मतांमुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. काँग्रेसने कराळे गुरुजींचे आभार मानले पाहिजेत. त्यांच्या मतांमुळे काँग्रेसची इज्जत राहिली. स्वतःच्या हिमतीवर काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला नाही,” असे राणे म्हणाले. काँग्रेसने या निकालाचा जल्लोष करण्याऐवजी त्यामागील मतदानाचा क्रम समजून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, “राऊत यांनी दुसऱ्यांच्या पक्षात काय चालले आहे, यावर बोलण्याऐवजी उबाठाने उभे केलेले तीन उमेदवार किती मतांनी पराभूत झाले, याचे विश्लेषण करावे. आमच्या पक्षाचे आम्ही पाहून घेऊ. त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांच्या मार्गदर्शनाची गरज नाही,” असे राणे म्हणाले. महायुतीतील मतभेद आणि काही नेत्यांच्या वक्तव्यांबाबत विचारले असता राणे म्हणाले, “महायुतीत काही शकुनी मामा बसले आहेत का, जे उद्धव ठाकरेंना आवडेल अशी स्क्रिप्ट वाचतात, हे तपासण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला सुखाने झोपता यावे, यासाठी काही लोक महायुतीत काम करत नाहीत ना, हे पाहावे लागेल. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची भूमिका तपासली पाहिजे.”
महायुतीतील मित्रपक्षांनी अपेक्षित सहकार्य केले नसल्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, निकालाचे विश्लेषण करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. “मतपत्रिकांमुळे निकाल उशिरा लागला. कोणत्या मतदारसंघात काय घडले, कोणी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली, याचा अभ्यास केला जाईल. आमचे प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेते माहिती गोळा करत आहेत. सर्व माहिती आल्यानंतर निकालाचे विश्लेषण होईल, आत्मपरीक्षण केले जाईल आणि जिथे गरज असेल तिथे संबंधितांना समज दिली जाईल. त्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू होईल,” असे राणे यांनी स्पष्ट केले.
मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांच्या निवडणुकीत नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल ऐनवेळी बदलल्याने सगळ्यांनाच ...
वरिष्ठांकडून विश्लेषण सुरू
निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अवैध मते बाद झाल्याबाबत विचारले असता, मतदार सुशिक्षित असला तरी मतदान करताना चुका होत असतील, तर सर्व राजकीय पक्षांनी त्याचा विचार करायला हवा, असे राणे म्हणाले. नागपूरमधील अवैध मतांचा निकालावर किती परिणाम झाला, याचे विश्लेषण नंतर केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. भाजपचे उमेदवार पैशांच्या जोरावर निवडून आल्याच्या आरोपांवर राणे म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 132 आमदार राज्यातील जनतेने निवडून दिले. आम्हाला पैसे किंवा दमदाटी करण्याची गरज नाही. आम्ही लोकांची मने जिंकणारे आहोत.” निवडणुकीतील निकालानंतर पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसून आढावा घेतील आणि त्यानुसार पुढील निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.(MAHAYUTI)
वुमन्स प्रीमियर लीगच्या आतापर्यंत झालेल्या चार पर्वात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रेंचायझी यशस्वी ठरल्या आहेत. या दोन्ही ...
काँग्रेसने राहुल गांधींऐवजी कराळे मास्तरांचा फोटो लावावा
नागपूरमधील विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार अपक्ष उमेदवार नितीन कराळे गुरुजी यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे विजयी झाला. त्यामुळे काँग्रेसने या निकालाचा जल्लोष करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घ्यावी. राहुल गांधी यांचा चेहरा दाखवून निवडणूक लढलेल्या काँग्रेसने नौटंकी थांबवून राहुल गांधींऐवजी कराळे मास्तरांचा फोटो लावावा, अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली.
दरम्यान, राहुल गांधी यांनी 1 नोव्हेंबरच्या प्रस्तावित रॅलीला ‘हिंदुस्थानच्या आत्म्याची रॅली’ असे संबोधल्याच्या प्रश्नावरही राणे यांनी प्रतिक्रिया दिली. दिवाळीसारखा हिंदूंचा मोठा सण जवळ आलेला असताना आंदोलन किंवा रॅलीमुळे व्यापाऱ्यांना अडचणी निर्माण होऊ नयेत. हिंदूंच्या सणांच्या काळातच आंदोलनांचा विचार का केला जातो, असा सवाल करत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.