
विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरातील 'गार्डन अॅव्हेन्यू' इमारतीमधील एका बंद फ्लॅटमधून तिन्ही भावंडांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बाहेर आल्याने संपूर्ण परिसरात मोठी दहशत पसरली आहे. कुमार मनसुखलाल मेहता (५०), दिपेश मनसुखलाल मेहता (५२) आणि खेवणा मनसुखलाल मेहता (४८) असे मृत्यू झालेल्या सख्ख्या दोन भावांचे व बहिणीचे नाव आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या तिघांनीही विष प्राशन करून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्लोबल सिटीमधील के-३-डी विंगच्या रूम नंबर १२०३ मधून अचानक दुर्गंधी सुटल्याने शेजाऱ्यांनी सोसायटीच्या मॅनेजमेंटला याची कल्पना दिली. त्यानंतर बोळींज पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि दरवाजा उघडून पाहणी केली असता तिघांचे मृतदेह आढळून आले. हे कुटुंब तीव्र आर्थिक अडचणीत सापडले होते आणि त्यातील एक भाऊ कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय आहे, मात्र फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच खरे कारण समोर येईल.
नाशिक : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील वधू-वरांना विवाहासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी समाज कल्याण विभागामार्फत कन्यादान योजना राबविण्यात येत ...
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने सर्व पुरावे गोळा केले आहेत व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. दरम्यान, याच इमारतीत मागील एका वर्षात अशा प्रकारची ही तिसरी दुर्दैवी घटना घडल्याने रहिवाशांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी एका माजी सैनिकाने आणि एका दहावीच्या विद्यार्थ्यानेही याच इमारतीत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बोळींज पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.



