1/5 भक्तीचा गजर, संत-महंतांचा पावन सहवास, धर्मध्वजाची दिव्य पताका आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचा महासागर... अशा अत्यंत मंगलमय आणि भावूक वातावरणात नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाचा भव्य शुभारंभ झाला. तपोवन परिसरामध्ये धर्मध्वजाचे पूजन करून आणि पारंपरिक ग्रामपरिक्रमा शोभायात्रेचे आयोजन करून या ऐतिहासिक सोहळ्याची नांदी करण्यात आली. (Photo: @girishdmahajan X)
2/5 तपोवनातील या पवित्र भूमीतून निघालेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि 'हरि ओम'च्या जयघोषात ही शोभायात्रा पुढे सरकत होती. या यात्रेत ध्वजधारी भाविक, पारंपरिक वेशाभूषा केलेले कलाकार आणि महाकुंभाची भव्य प्रतिकृती मुख्य आकर्षण ठरली. (Photo: @girishdmahajan X)
3/5 या धार्मिक सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते देशभरातून आलेले चार जगद्गुरू, तीनही प्रमुख आखाड्यांचे महंत, स्थानिक साधू-संत, वल्लभाचार्य संप्रदायाचे आचार्य आणि जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांची वंदनीय उपस्थिती. सर्व संतांच्या हस्ते पूजन आणि आशीर्वादपर संदेश देऊन या कुंभमेळ्याची औपचारिक सुरुवात करण्यात आली. (Photo: @girishdmahajan X)
4/5 कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले, "धर्मध्वज म्हणजे केवळ एक पताका नाही, तर तो आपल्या सनातन संस्कृतीचा गौरव, श्रद्धेचा महान विश्वास, अध्यात्माची ऊर्जा आणि शतकानुशतके जपल्या गेलेल्या धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. साधू-संत, आखाडे आणि भाविकांना एकाच अध्यात्मिक धाग्यात बांधणारा हा सोहळा आहे." (Photo: @girishdmahajan X)
5/5 या मंगलमय सोहळ्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाची सुरुवात झाली असून, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रशासनाकडून आणि स्थानिकांकडून येणाऱ्या सर्व भाविकांच्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. (Photo: @girishdmahajan X)