Saturday, October 31, 2026

Ashutosh Dixit : एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; 43 वर्षांच्या सेवेनंतर ए. पी. सिंह निवृत्त

या पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी एकात्मिक संरक्षण दलाच्या मुख्यालयात चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षांचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते.

Defence News: एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी शनिवारी भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. तब्बल 43 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेले एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांच्यानंतर दीक्षित यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली महत्त्वाची भूमिका

ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि धोरणात्मक नियोजनाचा अनुभव असलेले आशुतोष दीक्षित यापूर्वी भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. या पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी एकात्मिक संरक्षण दलाच्या मुख्यालयात चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षांचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते.

जवळपास चार दशकांची कारकीर्द

एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांची लष्करी कारकीर्द जवळपास चार दशकांची आहे. ते लढाऊ वैमानिक आणि प्रायोगिक चाचणी वैमानिक आहेत. त्यांच्या नावावर 3,500 तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव आहे. मिराज-2000, जॅग्वार, मिग श्रेणीतील विविध विमाने, तेजस, हॉक, किरण, एएन-32 आणि आयएल-78 यांसारखी विमाने त्यांनी हाताळली आहेत.

त्यांनी ऑपरेशन सफेद सागर, ऑपरेशन रक्षक, कोप इंडिया आणि ऑपरेशन सिंदूर यांसारख्या महत्त्वाच्या लष्करी मोहिमा आणि सरावांमध्ये सहभाग घेतला आहे.

महत्त्वाच्या पदांवर केले काम

आशुतोष दीक्षित हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी, बांगलादेशातील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. ते पात्र उड्डाण प्रशिक्षकही आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी हवाई दलाच्या टेस्ट पायलट्स स्कूलमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर एका लढाऊ स्क्वाड्रनची कमान सांभाळली.

पुढे त्यांनी पश्चिम विभागातील आघाडीच्या लढाऊ विमानतळाचे आणि दक्षिण विभागातील लढाऊ विमान प्रशिक्षण तळाचे नेतृत्व केले. तसेच दक्षिणी हवाई कमांडमध्ये हवाई संरक्षण कमांडर म्हणूनही जबाबदारी पार पाडली. हवाई मुख्यालयात सहायक हवाई दल प्रमुख (प्रकल्प), सहायक हवाई दल प्रमुख (योजना) आणि उप हवाई दल प्रमुख यांसारखी वरिष्ठ पदे त्यांनी भूषवली आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >