Nashik : ग्राहकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न देण्याच्या नियमांना हरताळ फासणारा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. मुंबई-आग्रा महामार्गालगत समांतर रोडवरील चेतनानगर येथील कुकुम्बर हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या स्वयंपाकघरात तांदळाच्या साठ्यात मृत पाल, तर तांदळाच्या गोणीत उंदराची विष्ठा आढळली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणीत हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित हॉटेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं ?
अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गद्रे यांनी २८ ऑक्टोबर रोजी हॉटेलमध्ये अचानक तपासणी केली. यावेळी तांदळाच्या कोठीत मृत पाल आणि तांदळाच्या गोणीत उंदराची विष्ठा आढळून आली. याशिवाय शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ एकाच फ्रीजमध्ये कोणतीही स्वतंत्र व्यवस्था न करता ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले.
तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील अस्वच्छतेचे अनेक प्रकार समोर आले. किचनच्या छताचे पापुद्रे निघालेले होते. तसेच अन्नपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे एप्रन, हातमोजे आणि डोक्याचे संरक्षक आवरण यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने नव्हती. हॉटेल प्रशासनाला पाणी तपासणीचे अहवाल, पेस्ट कंट्रोलची कागदपत्रे, कच्च्या मालाच्या खरेदीची बिले तसेच कर्मचाऱ्यांच्या अन्न सुरक्षा प्रशिक्षणासंबंधीची आवश्यक कागदपत्रेही सादर करता आली नाहीत.
नाशिक : दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नाशिक रोड रेल्वे स्थानकावर महत्त्वाचा ...
एफडीएकडून तातडीची कारवाई
तपासणी अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एफडीएचे पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त झा. सु. महाले यांनी २९ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. हॉटेलचा अन्न परवाना (परवाना क्रमांक : १११३०९२०००४८९) निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असल्याने पुढील आदेश मिळेपर्यंत हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांची निर्मिती किंवा विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे हॉटेलमधील अन्नपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि अन्न सुरक्षा नियमांच्या पालनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.