Mahalakshmi Express : मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री लूटमारीची घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील सालपे रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून रेल्वे थांबवण्यात आली. त्यानंतर 5 ते 6 जणांच्या टोळीने आरक्षित डब्यातील महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ( Mahalakshmi Express)
Mumbai News: लग्नसमारंभातील भोजनानंतर नवविवाहित जोडप्यासह वऱ्हाडी मंडळींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना भांडुप-नाहूर परिसरात घडली आहे. 1 नोव्हेंबर रोजी ...
सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रेल्वे थांबवली
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास महालक्ष्मी एक्स्प्रेस सालपे स्थानकाजवळ आली असता सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. अज्ञात व्यक्तींनी सिग्नल यंत्रणेच्या वायरची तोडफोड केल्याचा प्राथमिक संशय आहे. त्यामुळे रेल्वे सुमारे 15 मिनिटे थांबली. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी आरक्षित डब्यांमधील महिला प्रवाशांना लक्ष्य केले.
कोल्हापूर येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी निघालेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे 2 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
पळून जाताना तीन डब्यांवर दगडफेक
या घटनेत 5 ते 6 जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यापैकी काही जणांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड केला, तर इतरांनी डब्यांमध्ये जाऊन दागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. महिलांनी आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
पळून जाताना चोरट्यांनी रेल्वेच्या एस-2, एस-3 आणि एस-5 या डब्यांवर दगडफेक केल्याचेही समोर आले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दोन ठिकाणी स्वतंत्र गुन्हे दाखल
सिग्नल यंत्रणेच्या तोडफोडीप्रकरणी लोणंद रेल्वे सुरक्षा दलाकडे (RPF), तर दागिने चोरीप्रकरणी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. रेल्वे प्रशासनाने पहाटे सव्वापाचच्या सुमारास दुरुस्ती करून सिग्नल यंत्रणा पूर्ववत केली.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकाची मदत घेतली जात आहे. चोरट्यांची ओळख पटवून त्यांना पकडण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.