मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त असलेले राज्याचे अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादीला मिळावे, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी रविवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या अर्थ खात्याचा कार्यभार असून, हे खाते राष्ट्रवादीला परत हवे असल्याचे सांगितले जात आहे. या भेटीच्या छायाचित्रांमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार दिसत नसल्याने पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चांनाही उधाण आले. मात्र, ही भेट पूर्वनियोजित आणि औपचारिक होती. सुनेत्रा पवार यांनीच अमित शाह यांच्याकडे ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळासाठी वेळ मागितला होता, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील या नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचे छायाचित्र समोर आल्यानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीवरून राजकीय चर्चांना सुरुवात झाली. पक्षात अंतर्गत नाराजी आहे का, नेतृत्वामध्ये समन्वयाचा अभाव आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा पराभव झाल्याने पक्षातील कुरबुरी वाढल्याचीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
मुंबई : "जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि बंदर विकास क्षेत्रात महाराष्ट्राला देशातील आघाडीचे केंद्र बनविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने धोरणात्मक ...
दरम्यान, या भेटीचा अर्थ पक्षांतर्गत संघर्षाशी जोडणे चुकीचे असल्याचे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी यापूर्वी अमित शाह यांची भेट घेतली होती. त्याच वेळी सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली होती. तसेच या भेटीसाठी वेळ देण्याची विनंतीही त्यांनी केली होती. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीतील भेट ही आधीच नियोजित होती, असे पाटील यांनी सांगितले.
दिवंगत अजित पवार यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे विषय, राज्याच्या हिताचे प्रश्न आणि पक्षाशी संबंधित विविध बाबींची ज्येष्ठ नेत्यांना सखोल माहिती आहे. या विषयांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने ही भेट झाली. यावेळी नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांतील प्रश्नही अमित शाह यांच्यासमोर मांडले. महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये होणारी अनौपचारिक चर्चा आणि विचारांची देवाणघेवाणही या भेटीत झाली. त्यामुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना डावलून ही भेट झाल्याच्या बातम्या चुकीच्या, तथ्यहीन आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आजच्या दिल्लीतील भेटीला अनावश्यक राजकीय रंग देऊन पक्षांतर्गत मतभेदांचे कथानक निर्माण करण्याचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे.
यापूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी पवार आणि खासदार मा. पार्थ पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह साहेबांची भेट घेऊन स्व. अजितदादांच्या निधनानंतर पक्षासमोरील विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली होती.
विशेष म्हणजे, त्याच भेटीदरम्यान सुनेत्रावहिनी पवार यांनी स्वतः पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ आपली भेट घेणार असल्याची कल्पना शाह साहेबांना दिली होती आणि त्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याची विनंतीही केली होती.
स्व. अजितदादांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाचे विषय, राज्याच्या हिताचे प्रश्न आणि पक्षाशी संबंधित विविध बाबींची या ज्येष्ठ नेत्यांना सखोल माहिती आहे. त्याच अनुषंगाने आजची ही पूर्वनियोजित, औपचारिक भेट झाली.
या भेटीदरम्यान संबंधित नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांतील विविध प्रश्न मांडले. तसेच महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये स्वाभाविकपणे होणारी अनौपचारिक चर्चा आणि विचारांची देवाणघेवाणही झाली.
मात्र, सुनेत्रावहिनी पवार आणि पार्थ पवार यांना डावलून ही भेट झाल्याच्या बातम्या पूर्णतः चुकीच्या, तथ्यहीन आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत.
काही अदृश्य शक्तींकडून अशा बातम्या पेरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आहेत, नेतृत्वामध्ये समन्वय नाही, असे कृत्रिम कथानक निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. हा निव्वळ खोडसाळपणा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा महत्त्वाचा घटक असून आमचा पक्ष राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुनेत्रावहिनी पवार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली एकसंघ आणि एकदिलाने कार्यरत आहे.
माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध करताना वस्तुस्थितीची खातरजमा करावी. केवळ तर्कवितर्कांच्या आधारे पक्षांतर्गत संघर्षाचे चित्र रंगविणे योग्य नाही.
मित्रपक्षांच्या नेत्यांमधील औपचारिक भेटीचे राजकारण करू नका. पेरलेल्या बातम्या आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यातील फरक समजून घ्या!
— उमेश पाटील
मुख्य राष्ट्रीय प्रवक्ता
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
@TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat @LoksattaLive @News18lokmat @lokmat @LokshahiMarathi @MaxMaharashtra @zee24taasnews @TOIMumbai @mumbaitak @PuneTimesOnline @TOIPune @bbcnewsmarathi
— Umesh Patil (@umeshpatilspeak) November 2, 2026
मागणी पूर्ण होणार का?
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थ खाते भाजपकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याचा कार्यभार सांभाळत आहेत. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले असले, तरी अर्थ खाते राष्ट्रवादीकडे परत आलेले नाही. त्यामुळे हे खाते पुन्हा मिळावे, यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला अर्थ खाते परत मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. पक्षात मतभेद असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी काही अदृश्य शक्तींकडून बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोपही उमेश पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा महत्त्वाचा घटक असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंघपणे काम करत आहे. मित्रपक्षांतील औपचारिक भेटीला अंतर्गत राजकारणाचे स्वरूप देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.