हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला राजकीय धक्का बसला आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत हिंगोलीचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
Maharashtra News: आधार कार्ड आणि जन्म दाखला यांसारखी आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे अनेक आदिवासी नागरिक शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहतात. ही अडचण दूर ...
शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला शिवसेनेचा भगवा
ठाण्यात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला कळमनुरीचे विद्यमान आमदार संतोष बांगर उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश होता. या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला संघटनात्मक बळ मिळाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना सर्वसामान्यांच्या आणि समाजाच्या विकासासाठी काम करते, असे त्यांनी सांगितले. डॉ. संतोष टारफे हे आदिवासी समाजाचे नेतृत्व करत असून, त्यांच्या माध्यमातून या समाजाच्या उन्नतीसाठी अधिक व्यापक काम करता येईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी सहकार्याची ग्वाही
"समाजाचे काम करा, शिवसेनेचे काम करा. तुमच्या विकासकामांसाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी शिवसेना कायम तुमच्या पाठीशी उभी राहील. कोणतीही कमतरता भासू देणार नाही," अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यात आमदार संतोष बांगर यांच्या माध्यमातून यापूर्वी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे शिंदे यांनी नमूद केले. यापुढेही अपूर्ण विकासकामे, पायाभूत सुविधा आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हिंगोलीत मोठा मेळावा घेण्याचे आवाहन
पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षसंघटनेसोबतच समाजाच्या विकासासाठीही सक्रियपणे काम करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. तसेच लवकरच हिंगोलीत मोठा मेळावा आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली. या मेळाव्याला आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी आमदार संतोष बांगर, आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना सचिव राम रेपाळे, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.