Thursday, November 5, 2026

Mumbai Crime News : आयुष्मान खुराना, तुषार कपूर यांना धमकी देणारा आरोपी अटकेत; बंगळुरूमधून IT इंजिनिअरला अटक

आरोपीच्या अटकेमुळे या प्रकरणात तो एकटाच सहभागी होता की त्याच्यासोबत आणखी काही जण होते, हे स्पष्ट होण्यास मदत होईल.

Mumbai Crime News: आयुष्मान खुराना  ( Ayushmann Khurrana) आणि तुषार कपूर ( Tusshar Kapoor) यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचे ईमेल आणि ऑडिओ संदेश पाठवल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली आहे. वैभव मिश्रा असे या आरोपीचे नाव असून, तो व्यवसायाने आयटी इंजिनिअर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला बंगळुरूमधून ताब्यात घेण्यात आले.

लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी स्वतःची ओळख लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे सांगून चित्रपट कलाकारांना धमक्या देत होता. तसेच त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

डीसीपी राजतिलक रोशन यांनी सांगितले की, आरोपीच्या अटकेमुळे या प्रकरणात तो एकटाच सहभागी होता की त्याच्यासोबत आणखी काही जण होते, हे स्पष्ट होण्यास मदत होईल. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची आणि संदेशांची तपासणी सुरू आहे.

आयुष्मान खुरानाकडे 2 कोटींची मागणी

पोलिसांच्या सूत्रांनुसार, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अनेक चित्रपट कलाकारांना धमकीचे संदेश मिळत होते. अभिनेता आयुष्मान खुराना यालाही एक ऑडिओ संदेश पाठवण्यात आला होता. संदेश पाठवणाऱ्याने स्वतःचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी असल्याचा दावा केला आणि आयुष्मानकडे कथितपणे 2 कोटी रुपयांची मागणी केली.

यापूर्वी अभिनेता तुषार कपूरलाही धमकीचा ऑडिओ संदेश मिळाला होता. या संदेशात पाठवणाऱ्याने स्वतःची ओळख बिश्नोई गँगचा सदस्य हॅरी बॉक्सर अशी करून दिली होती. तुषार कपूरकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्राथमिक तपासात धमकी देण्यासाठी वापरण्यात आलेला ऑडिओ बनावट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न

18 ऑक्टोबर रोजी अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर टोळीचा कथित सदस्य अनिल पंडित याने सोशल मीडियावर सलमान खानच्या जवळच्या व्यक्तींना धमक्या दिल्याचे वृत्त आहे.

या संदेशांमध्ये सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई आणि बिश्नोई समाजाची माफी मागण्यास सांगण्यात आले होते. तसेच त्याच्या कुटुंबालाही इजा पोहोचवण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस कलाकारांना मिळणाऱ्या धमक्यांचा तपास करत आहेत. वैभव मिश्रा याच्या अटकेनंतर या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >