Thursday, November 5, 2026

Nashik : नाशिकमध्ये भीषण आग ! तिग्रानिया चौकातील भंगार गोदाम जळून खाक

आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन मुख्यालयातून अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन पंचवटी, सिडको आणि सातपूर विभागीय कार्यालयांतील अग्निशमन बंबही घटनास्थळी बोलावण्यात आले.

Nashik  : नाशिक शहरातील द्वारका परिसरातील टाकळी रोडवरील तिग्रानिया चौकाजवळ असलेल्या भंगार गोदामाला गुरुवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तब्बल आठ अग्निशमन बंबांच्या मदतीने जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत सुमारे एका तासात आगीवर नियंत्रण मिळवले.

पहाटे सहाच्या सुमारास गोदामातून धुराचे लोट

मिळालेल्या माहितीनुसार, द्वारका परिसरातील टाकळी रोडवर तिग्रानिया कंपनीजवळ तिग्रानिया चौकात मोठे भंगार गोदाम आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भंगाराचा व्यवसाय केला जातो. गुरुवारी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास अचानक गोदामातून धूर येऊ लागला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण गोदामात आग पसरू लागली. दरम्यान, सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आली. गणेश तांबे यांनी तत्काळ अग्निशमन दलाला फोन करून घटनेची माहिती दिली.

आठ अग्निशमन बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण

आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन मुख्यालयातून अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन पंचवटी, सिडको आणि सातपूर विभागीय कार्यालयांतील अग्निशमन बंबही घटनास्थळी बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी एकूण आठ बंबांच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुमारे सकाळी ७.१५ ते ७.३० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, आगीचे पूर्णपणे शमन करण्यासाठी त्यानंतरही अडीच तासांहून अधिक काळ पाण्याचा मारा सुरू ठेवण्यात आला. गोदामातील धग कमी करण्यासाठी कुलिंग ऑपरेशनही करण्यात आले.

पोलिसांचा बंदोबस्त; नागरिकांची गर्दी नियंत्रित

गोदामाला आग लागल्याची बातमी परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. आगीची तीव्रता पाहता परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.घटनेची माहिती मिळताच भद्रकाली आणि उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती हाताळत नागरिकांची गर्दी नियंत्रित केली. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्याच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली.या बचावकार्यामध्ये अग्निशमन दलाचे कर्मचारी ए. शिर्के, एस. आर. थोरात, पटेल, महेश कदम, शरद बेटके, मंगेश जाधव, प्रदीप वाघ, स्वप्निल नांद्रे, अनुराग पराग यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

अनधिकृत भंगार दुकानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

तिग्रानिया चौकातील भंगार गोदामाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर शहरातील अनधिकृत भंगार दुकाने आणि गोदामांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. शहरातील विविध भागांत अशा प्रकारचे भंगार व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील साहित्य साठवले जात असल्यास आगीसारख्या दुर्घटनांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा अनधिकृत व्यवसायांची तपासणी करून नियमबाह्य दुकाने हटवावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या आगीमुळे भंगार गोदामांच्या सुरक्षेचा आणि अनधिकृत व्यवसायांच्या नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण आणि झालेल्या आर्थिक नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >