
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील वसुंधरा पोलीस ठाण्यात अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली. या घटनेत एक उपनिरीक्षक आणि एक डिलिव्हरी बॉय जखमी झाले आहेत. स्फोटामुळे पोलीस ठाण्यातील खिडक्या आणि दरवाजांच्या काचा फुटल्या. स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळी तपास सुरू आहे.
स्फोटात काचा फुटल्याने दोघे जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरापुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसुंधरा पोलीस ठाण्यात ही घटना घडली. स्फोट झाला, त्यावेळी पोलीस ठाण्यात एक उपनिरीक्षक आणि डिलिव्हरी बॉय उपस्थित होते. स्फोटाची तीव्रता इतकी होती की खिडक्या आणि दरवाजांच्या काचा फुटल्या. काचेचे तुकडे लागल्याने दोघेही जखमी झाले.
डिलिव्हरी बॉयला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी उपनिरीक्षकाच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.
Ghaziabad, Uttar Pradesh | On the reports of an explosion inside the Vasundhara police chowki (outpost), Indirapuram ACP Suryabali Maurya said, "The exact nature of the object that caused the explosion will only be determined following an investigation. A sub-inspector from the Vasundhara police outpost and a delivery boy, who had arrived to drop off an item, were present at the scene. The delivery boy sustained injuries from the shattered glass."
More details are awaited.
— ANI (@ANI) November 7, 2026
स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट
इंदिरापुरमचे एसीपी सूर्यबली मौर्य यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सविस्तर न्यायवैद्यक आणि तांत्रिक तपासानंतरच याबाबत स्पष्टता येईल, असे त्यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून स्फोटामागील कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. स्फोटाचा स्रोत आणि त्यामागील नेमकी परिस्थिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.






