Friday, November 6, 2026

आंध्र प्रदेशात 'मुरासू' चक्रीवादळाचा हाहाकार; 8 जणांचा मृत्यू, तब्बल 1900 कोटींहून अधिकचे अवाढव्य नुकसान!

आंध्र प्रदेशात मुरासू चक्रीवादळाच्या तडाख्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 1,918 कोटींचे नुकसान झाले आहे; मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत मदतीचे आश्वासन दिले आहे.

अमरावती: आंध्र प्रदेशात 'मुरासू' (Murasu) चक्रीवादळाने अभूतपूर्व विध्वंस घडवला असून संपूर्ण राज्यात मानवी जीवनासह शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार, या भीषण वादळामुळे आतापर्यंत 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर सुमारे 1,918 कोटी रुपयांच्या संपत्तीचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळामुळे राज्यातील लाखो शेतकरी संकटात सापडले असून मदत आणि बचावाचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

3 नोव्हेंबरच्या पहाटे हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले, त्यानंतर मध्य आंध्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला. मध्य आंध्रातील पालनाडू जिल्ह्यातील एडलपाडू येथे अवघ्या 24 तासांत तब्बल 269 मिमी पावसाची नोंद झाली, तर कृष्णा जिल्ह्यातील घंटसाला येथे 223 मिमी पाऊस पडल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. पाण्याची पातळी वाढल्याने विजयवाडा येथील प्रकाशम बंधाऱ्याचे सर्व 70 दरवाजे उघडावे लागले आणि तब्बल 71 हजार क्युसेक पाणी कृष्णा नदीत सोडावे लागले.

या नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे 1 लाख 43 हजार हेक्टर क्षेत्रावरील उभी पिके पाण्याखाली गेली असून, त्यामुळे तब्बल 1 लाख 86 हजार शेतकरी थेट प्रभावित झाले आहेत. मृतांमध्ये बापटला जिल्ह्यातील 5, गुंटूरमधील 2 आणि पालनाडू येथील 1 व्यक्तीचा समावेश आहे. याशिवाय वादळामुळे 983 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून किनारपट्टी भागातील 346 बोटी आणि 220 मासेमारी जाळ्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे मच्छिमारांचे अतोनात हाल झाले आहेत.

परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष गुंटूर आणि बापटला जिल्ह्यांतील वादळग्रस्त भागांचा दौरा केला. जिल्लेलमुडी ते रेतुरु या गावांदरम्यान चिखलातून आणि पाण्यातून पायी चालत त्यांनी पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या भातशेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. पीक विमा आणि विशेष सरकारी अनुदानातून सर्व बाधित शेतकऱ्यांना पूर्ण नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तातडीची मदत म्हणून राज्य सरकारने 37 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे.

प्रशासन यंत्रणा तातडीने कामाला लागली असून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे कार्य सुरू आहे. 1,103 पैकी 871 वीजवाहिन्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत, तर 232 वाहिन्यांवर काम सुरू आहे. दूरसंचार सेवा 97 टक्क्यांपर्यंत सुरळीत झाली आहे. दरम्यान, राजधानी अमरावती पाण्याखाली गेल्याच्या सोशल मीडियावरील दाव्यांना सरकारच्या तथ्य-तपासणी पथकाने (Fact-Check) कठोर शब्दांत फेटाळून लावले असून, केवळ अपूर्ण रस्त्यांच्या कामांच्या ठिकाणी काही प्रमाणात पाणी साचल्याचे स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >