Saturday, November 7, 2026

Nashik TCS Case : टीसीएस प्रकरणात मोठी अपडेट ! माजी खासदार-नगरसेवकासह 11 जणांवर खटला, नव्या संशयितांविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल

Nashik TCS Case : नाशिकमधील टीसीएस कंपनीशी संबंधित तरुणीच्या विनयभंग, लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या आरोपांप्रकरणी तपासाला नवे वळण मिळाले आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात संशयितांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे. या प्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) संशयित क्रमांक ५ ते ११ यांच्याविरोधात नाशिक जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या घडामोडीमुळे प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, पुढील न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी निश्चित केली आहे.

निदा खानसह कुटुंबीयांचाही तपासात समावेश

या प्रकरणातील संशयितांमध्ये टीसीएस कंपनीची तत्कालीन कर्मचारी निदा खान हिच्यासह तिचे कुटुंबीय आणि नातेवाईकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. तसेच या प्रकरणात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नावही चर्चेत आले असून, त्यांच्या भूमिकेबाबत तपास यंत्रणेने यापूर्वी चौकशी केली होती.

एसआयटीकडून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) विविध तांत्रिक बाबींची तपासणी केली आहे. तपासादरम्यान कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), तांत्रिक विश्लेषण आणि फॉरेन्सिक अहवालांचा आधार घेण्यात आल्याची माहिती आहे. या तपासातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संशयितांचा सहभाग तपासण्यात आला. त्यानंतर संशयित क्रमांक ५ ते ११ यांच्याविरोधात पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान नाशिक एसआयटीचे प्रमुख तथा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी माजी खासदार इम्तियाज जलील यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांची चौकशी करून जबाब नोंदविण्यात आला होता.

१९ नोव्हेंबरच्या सुनावणीकडे लक्ष

पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाल्याने या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया आता पुढील टप्प्यात पोहोचली आहे. एकूण संशयितांची संख्या ११ झाल्यामुळे तपासातील पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत. आता १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते आणि पुढील तपासासंदर्भात कोणत्या घडामोडी घडतात, याकडे नाशिकसह राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >