Sunday, November 8, 2026

Mumbai Fire Incident: अंधेरीतील उंच इमारतीला भीषण आग, धुरात गुदमरून एकाचा मृत्यू

मुंबई : दिवाळीच्या धामधुमीत मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला येथील एका बहुमजली इमारतीत शनिवारी रात्री आग लागली. या दुर्घटनेत धुरामुळे गुदमरून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. लोखंडवाला ब्रिजजवळ असलेल्या रुणवाल टॉवरमध्ये ही आग लागल्याचे समजते. ही इमारत खूप उंच आहे. यामध्ये तळमजला, बेसमेंट, पोडियम आणि त्यावर अनेक मजले आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास इमारतीतील एका फ्लॅटमधून धूर निघताना दिसला. काही वेळातच आगीने मोठे रूप घेतले.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांच्यासोबत पोलीस, महापालिकेचे कर्मचारी, वीज कंपनीचे लोक आणि रुग्णवाहिका देखील पोहोचली. जवानांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आग १७ व्या मजल्यावरील एका घरात लागली होती. घरातील विजेच्या तारा, इलेक्ट्रिक उपकरणे आणि इतर घरगुती वस्तूंनी पेट घेतला होता. आगीमुळे संपूर्ण मजल्यावर धूर पसरला होता.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे दीड तास अथक प्रयत्न केले. अखेर रात्री पावणेअकराच्या सुमारास आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. या घटनेत ४६ वर्षीय एक व्यक्ती धुरात गुदमरली होती. त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. धनपत महातू असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू आहे. दिवाळीच्या काळात फटाके आणि विजेची उपकरणे यामुळे आगीच्या घटना वाढतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >