
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर यंदाच्या दिवाळीत ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने फटाके वाजवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम म्हणून दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुंबईतील फटाक्यांचा आवाज मागील 20 वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याचा दावा आवाज फाउंडेशनने केला आहे. दरम्यान, 'ग्रीन क्रॅकर्स'सह अनेक फटाक्यांच्या खोक्यांवर बंधनकारक असलेली डेसिबल पातळी नमूद नसल्याने, तसेच QR कोड नसणे किंवा असल्यास तो बनावट असणे, या बाबींवर आवाज फाउंडेशनने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नियमबाह्य फटाके फोडले जाणार नाहीत, यासाठी वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सर्व सार्वजनिक रस्ते, गल्ल्या व लेन्सवर फटाके फोडण्यास बंदी घातली असून शांतता क्षेत्रांत फटाके फोडण्यावर पूर्ण प्रतिबंध घातला आहे. स्वयंप्रेरणेने (Suo Motu) दाखल करून घेतलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हे आदेश देण्यात आले होते. यानंतर महापालिकेने मुंबईकरांना ग्रीन फटाके वाजवण्याचे आवाहन केले. त्यानुसार दिवाळीच्या एक दिवस आधी आवाजाच्या पातळीची नोंद ठेवणाऱ्या आवाज फाउंडेशनने मुंबईतील फटाक्यांच्या आवाजाची पातळी गेल्या 2 दशकांत लक्षणीयरीत्या घटली असली, तरी आजही ती सर्व क्षेत्रांतील कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे.
आवाज फाउंडेशन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांनी 2006 पासून मोकळ्या मैदानात फटाके फोडून त्यांच्या आवाजाची संयुक्त चाचणी केली आहे. 2006 मध्ये फटाक्यांचा कमाल आवाज 144.9 डेसिबल होता, तर 2026 मध्ये तो 93 डेसिबलपर्यंत खाली आला. 2006 मध्ये चाचणी केलेले सर्वच फटाके 4 मीटर अंतरावर 125 डेसिबलच्या कमाल मर्यादेचे उल्लंघन करणारे होते; 2026 मध्ये मात्र सर्व फटाके 93 डेसिबलच्या आत राहिले. दोन दशकांच्या जनजागृती आणि अंमलबजावणीचे हे यश असल्याचे फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुलाली यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मुंबई महानगरपालिकेने शहरात 110 शांतता क्षेत्रे (सायलेन्स झोन) अधिसूचित केली असून तेथे कधीही फटाके फोडता येणार नाहीत. तसेच कोणत्याही क्षेत्रात रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान फटाके फोडण्यास बंदी आहे. निवासी क्षेत्रात ध्वनी मर्यादेचे पालन करायचे झाल्यास 55 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणारा फटाका वापरता येणार नाही.
नवी दिल्ली : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला आणि जगभरातील भारतीयांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या ...
खोटे QR कोड, चुकीची माहिती
3 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईच्या बाजारातून सहज उपलब्ध असलेले फटाके खरेदी करण्यात आले आणि 5 नोव्हेंबर रोजी MPCB सोबत त्यांची ध्वनी चाचणी करण्यात आली. 'ग्रीन क्रॅकर्स'सह अनेक फटाक्यांच्या खोक्यांवर बंधनकारक असलेली डेसिबल पातळी नमूद केलेली नसल्याचे आढळले. चाचणी केलेल्या फटाक्यांवर बंधनकारक असलेला QR कोड एकतर नव्हता किंवा बनावट होता. खोक्यांवरील माहिती अविश्वसनीय असून, मुंबईतील आधीच खराब हवेच्या गुणवत्तेत फटाके फोडणाऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण त्यातून होत नाही, असे फाउंडेशनने म्हटले आहे.
आवाज फाउंडेशनने 2012 पासून फटाक्यांमधील रसायने व जड धातूंची स्वतंत्र चाचणी करून त्याची तुलना मुंबईच्या बाजारातील खोक्यांवर दिलेल्या माहितीशी केली आहे. यंदाच्या चाचणीत बेरियमसह बंदी असलेली घातक रसायने आढळली, तसेच खोक्यांवरील माहिती फटाक्यातील रसायनांची अचूक नोंद करत नसल्याचेही स्पष्ट झाले. रसायन व जड धातू चाचणीचा अहवाल पत्रासोबत जोडला असल्याचेही म्हटले आहे.
नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असल्याची आठवण करून देत, पर्यावरण (संरक्षण) कायद्यातील सर्व अटी आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन न करणारे कोणतेही फटाके फोडले जाणार नाहीत, याची मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक पातळीवर खात्री करावी, असे आवाहन आवाज फाउंडेशनने या पत्राद्वारे केले आहे.






