मुंबई : कथा, कविता, लेख आणि प्रवासवर्णनांच्या माध्यमातून विविध विषयांचा वेध घेणाऱ्या दैनिक ‘प्रहार’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन सोमवारी (दि. 9 नोव्हेंबर) राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा दैनिक ‘प्रहार’चे संस्थापक नारायण राणे, तसेच राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा दैनिक ‘प्रहार’चे संचालक नितेश राणे यांच्या हस्ते झाले. जुहू येथील अधिश निवासस्थानी हा प्रकाशन सोहळा पार पडला.
‘दै. प्रहार’च्या दिवाळी अंकात साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि समकालीन विषयांवरील लेखनाचा समावेश करण्यात आला आहे. तंत्रज्ञानातील बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), राजकारणातील नवे प्रवाह, संस्कार आणि मानवी मूल्ये अशा विविध विषयांवर लेखकांनी आपले विचार मांडले आहेत. प्रल्हाद जाधव यांचे ‘एव्हरेस्टच्या पायथ्याशी’ हे प्रवासवर्णन अंकाचे वैशिष्ट्य आहे. डॉ. स्वाती विनय गानू यांचा ‘जुन्या संस्कारांना हवी नवी दृष्टी’, निशा वर्तक यांचा ‘एआयच्या युगात माणूसपणाचा शोध’ आणि सुहास शेलार यांचा ‘डेटा ड्रिव्हन’ राजकारणाचा नवा ट्रेंड’ हे लेख समकालीन विषयांवर प्रकाश टाकतात. याशिवाय प्रमोद मोघे यांचा ‘श्रीकृष्ण, प्राजक्त आणि समर्पण’ आणि श्रीनिवास बेलसरे यांचा ‘सिनेगीतांतील दिवाळी’ हे लेखही वाचकांना अनुभवता येतील.
कथाविभागात निर्मोही फडके यांची ‘लिंबू मिर्ची’, अशोक बेंडखळे यांची ‘प्रोफेसर मित्रा’, सृष्टी गुजराथी यांची ‘दमलेल्या मेंदूची गोष्ट’, अद्वैत फीचर्सची ‘एआयची नानाविध रूपे’, डॉ. स्मिता दातार यांची ‘फॅमिली व्हर्जन २.०’ आणि सुरेश वांदिले यांची ‘चॅटजीपीटी का कचरला?’ या कथांचा समावेश आहे. त्याचबरोबर एकनाथ आव्हाड यांची ‘घरभर दरवळणारा सुगंध’, डॉ. रंजन गर्गे यांची ‘फॅन्टम पेन’, ऋतुजा केळकर यांची ‘उरलेलं आभाळ’ आणि इर्शाद बागवान यांची ‘रखरखतं ऊन आणि स्वप्नांची लाही’ या कथाही अंकात आहेत. कविताविभागात वीणा सानेक यांनी अनुवादित केलेल्या कुमार अंबुज यांच्या कविता आणि डॉ. प्रतिमा सराफ यांची ‘फक्त’ ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. विविध साहित्यप्रकार आणि विषयांची सांगड घालणारा हा दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे.
प्रकाशन सोहळ्याला दैनिक ‘प्रहार’चे संपादक पद्मभूषण देशपांडे, महाव्यवस्थापक मनीष राणे आणि लेखा व प्रशासन विभागप्रमुख ज्ञानेश सावंत यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी खा. नारायण राणे यांनी दैनिक ‘प्रहार’च्या टीमला दिवाळीच्या शुभेच्छा देताना, या अंकाचे कौतुकही केले.