Wednesday, November 11, 2026

Titwala Crime: मालमत्तेच्या वादातून मुलाने केला वडील आणि भावावर गोळीबार, टिटवाळ्यात खळबळ

मालमत्तेच्या वादातून एका तरुणाने स्वतःच्याच वडिलांवर आणि भावावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना टिटवाळ्यात घडली आहे. या घटनेत वडिलांच्या पोटात तर भावाच्या खांद्याला गोळी लागली आहे. दोघांनाही डोंबिवलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीचे नाव कल्पेश शेलार, वय ३५, असे आहे. कल्याण तालुका पोलिसांनी त्याला गुरवली पाडा, टिटवाळा येथून अटक केली. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी त्याच्यासोबत असलेली त्याची पत्नी रसिका शेलार, वय ३२, हिलाही अटक करण्यात आली आहे. गोळीबाराच्या वेळी ती सोबत होती आणि तिने रोखण्याचा प्रयत्न केला नाही, असा पोलिसांचा आरोप आहे. दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश हा गेल्या बराच काळापासून वडील बळीराम शेलार, वय ५५, आणि भाऊ भरत शेलार, वय ३२, यांच्याकडे कुटुंबाच्या शेतजमिनीत वाटा मागत होता. गेल्या वर्षभरापासून तो कुटुंबापासून वेगळा राहत होता. मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कल्पेश वडिलांच्या घरी गेला. त्यावेळी भाऊही घरीच होता. वाद वाढल्यानंतर त्याने गोळीबार केल्याचा आरोप आहे. एक गोळी वडिलांच्या पोटात लागली, तर दुसरी गोळी भावाच्या खांद्याला लागली. गोळीचा आवाज आणि आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. त्यांनी जखमींना तातडीने डोंबिवलीतील ज्युपिटर रुग्णालयात नेले. सध्या दोघेही अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. कल्पेशने बंदूक कुठून आणली, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याच्यावर यापूर्वीही दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >