धुळे : शिरपूर शहरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या अवघ्या २५ वर्षीय डॉक्टरचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. डॉ. आयुष चंद्रकांत पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूनंतर एक भावनिक चिठ्ठी समोर आली असून, त्यातील शब्दांनी कुटुंबीयांसह परिचितांनाही मोठा धक्का बसला आहे.
पीजी प्रवेश प्रक्रियेतील अडचणींमुळे मानसिक तणाव ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आयुषला सुमारे १३०० क्रमांक मिळाला होता. मात्र, प्रवेशाच्या पहिल्या फेरीत त्याला जागा मिळाली नाही. या निकालामुळे तो मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. ११ नोव्हेंबरच्या रात्री तो कुटुंबीयांसोबत घरी होता. मात्र, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा ...
सुसाइड नोटमधील शब्दांनी सर्वांचे डोळे पाणावले
मृत्यूपूर्वी डॉ. आयुषने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे, ज्यामधील मजकूर वाचणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. या चिठ्ठीत त्याने लिहिले आहे की, "माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका. माझे कुटुंबीय आणि मित्रांचा मी आभारी आहे. मी माझ्या जीवनात अयशस्वी झालोय. आय लव्ह यू मम्मी, पप्पा, दादा." असे लिहून त्याने खाली आपली स्वाक्षरी केली आहे. आई-वडील दोघेही शिक्षक असताना आणि मुलाने आयुष्यात एवढे यश मिळवूनही एका अपयशामुळे त्याने घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.
नीट परीक्षेत राज्यस्तरावर पहिल्या दहामध्ये
आयुष हा शिरपूरमधील विद्या विहार कॉलनी येथे वास्तव्यास होता. त्याचे वडील चंद्रकांत मुलचंद पवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक असून, आई मनीषा एकनाथ पाटील यादेखील शिक्षिका आहेत. आयुष हा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आणि गुणवंत विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. त्याने नीट परीक्षेत राज्यस्तरावर पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर मुंबईतील नामांकित केईएम रुग्णालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेऊन डॉक्टरकीच्या क्षेत्रात पुढे जाण्याचे त्याचे स्वप्न होते.
दरम्यान, घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि कारणांचा तपास पोलीस करत आहेत.