
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेरसह अनेक तालुक्यांमध्ये शनिवारी सकाळी अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास जमिनीला हादरे बसल्याने अनेक नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीही रावेर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्यामुळे पुन्हा एकदा हादरे बसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील सुखपुरी परिसरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सकाळी अचानक जमिनीला हादरे, नागरिकांमध्ये घबराट
शनिवारी सकाळी नागरिक आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक जमिनीला कंपन जाणवू लागले. काही क्षण घरातील वस्तू आणि साहित्य हलल्याचे नागरिकांनी सांगितले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनेकांना भूकंपाचा धक्का बसल्याची जाणीव झाली. खबरदारी म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडत सुरक्षित ठिकाणी जाणे पसंत केले. हादरे जाणवल्यानंतर परिसरातील नागरिकांनी एकमेकांना फोन करून माहिती घेतली. काही वेळातच ही बातमी रावेर तालुक्यातील विविध गावांमध्ये पसरली. यापूर्वीही या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे.
मध्य प्रदेशातील सुखपुरी येथे ४.५ तीव्रतेची नोंद
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्य प्रदेशातील सुखपुरी (ता. भागलपूर, जि. खरगोन) येथे रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. सातपुडा पर्वतालगत असलेल्या रावेर तालुक्यातील काही गावांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मध्य प्रदेशातील खंडवा परिसरापर्यंत हादरे जाणवल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या सर्व भागांमध्ये धक्क्यांची नेमकी व्याप्ती किती होती, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू, खोली आणि प्रत्यक्ष तीव्रता याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
नाशिक : लग्न करण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून एका तरुणाने तरुणीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड परिसरात उघडकीस आली आहे. ...
तहसील प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा
भूकंपाच्या धक्क्यांची माहिती मिळताच संबंधित तहसील प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. विविध गावांमधील मंडळ अधिकारी आणि स्थानिक यंत्रणांकडून माहिती मागवण्यात आली आहे. कोणत्या भागात किती तीव्रतेचे हादरे जाणवले, तसेच संभाव्य नुकसान झाले आहे का, याची पडताळणी सुरू आहे.
जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान नाही
प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत कोणत्याही गावात घर कोसळल्याचे, भिंतींना तडे गेल्याचे किंवा इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे सध्यातरी नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. मात्र, वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती कायम आहे. भूकंपाचा नेमका केंद्रबिंदू, तीव्रता आणि खोली याबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.





