
मायक्रोसॉफ्टच्या सेवेत आलेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील व्यवसाय आणि सरकारी कार्यालयांचे कामकाज मोठ्या प्रमाणात ठप्प झाले. ही समस्या 24 तासांहून अधिक काळ सुरू राहिली, त्यामुळे कंपनीची ईमेल सेवा आऊटलुक, ऑनलाईन बैठकांसाठीचे टीम्स आणि मायक्रोसॉफ्ट 365 या सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या. या जागतिक बिघाडामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला सुमारे 93 हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर मायक्रोसॉफ्ट कंपनीला थेट सुमारे 50 कोटी डॉलर म्हणजेच सुमारे 4,700 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आऊटलुक, टीम्स आणि मायक्रोसॉफ्ट 365 मधील ही अडचण सुमारे 22 ते 24 तास सुरू होती. याचा फटका 70 हून अधिक देशांतील सुमारे 43 कोटी वापरकर्ते आणि 37 लाख ते 40 लाख कंपन्यांना बसला. मायक्रोसॉफ्टच्या सेवा वापरून काम करणाऱ्या अनेक कंपन्यांची कामे पूर्णपणे थांबली. यात सरकारी कार्यालये आणि खासगी व्यवसायांचा समावेश होता. ही समस्या एखाद्या एका देशापुरती मर्यादित नव्हती, तर अनेक बाजारपेठांमध्ये पसरली होती. मायक्रोसॉफ्टचा मुख्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात सदस्यत्वावर आधारित आहे. त्यामुळे सेवेत आलेली अडचण लगेच कमाईवर परिणाम करणार नाही. तरीही कंपनीला 50 कोटी डॉलरपर्यंतचा थेट आर्थिक बोजा सहन करावा लागू शकतो. यात सेवा करारानुसार ग्राहकांना द्यावे लागणारे सेवा क्रेडिट, नुकसानभरपाई, ग्राहक सहाय्यावरील वाढता खर्च आणि तांत्रिक दुरुस्तीचा खर्च यांचा समावेश असू शकतो.
मुंबई: नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या 18 तासांपासून बंद असलेलं मायक्रोसॉफ्ट आऊटलूक (Microsoft Outlook)ची सेवा पुर्वपदावर येत आहे. 18 तास चाललेल्या ...
या बिघाडानंतर मायक्रोसॉफ्टच्या शेअरमध्येही घसरण पाहायला मिळाली. तांत्रिक बिघाडानंतर प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये कंपनीचे शेअर सुमारे 2 टक्क्यांनी घसरले. मायक्रोसॉफ्ट एका दिवसात किती कमाई करते, याचाही अंदाज लावण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या आकडेवारीनुसार कंपनीचे एकूण वार्षिक उत्पन्न सुमारे 331.84 अब्ज डॉलर होते. यानुसार सरासरी दैनिक उत्पन्न सुमारे 909.1 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 8,546 कोटी रुपये येते. तर 30 सप्टेंबर 2026 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 92.28 अब्ज डॉलर होते. त्यानुसार एका दिवसाचा व्यवसाय सुमारे 1 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 9,429 कोटी रुपये होतो. या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले की, मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या डिजिटल सेवेत अडचण आल्यास जगभरातील संस्थांवर किती मोठा परिणाम होऊ शकतो.





