
नाशिक : येवला शहरातील कासार गल्ली परिसरात घरफोडीची मोठी घटना उघडकीस आली आहे. कुटुंबीय देवदर्शनासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून तब्बल 12 लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेत सोन्याचे दागिने, चार लाख रुपयांची रोकड, दुचाकी तसेच सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर चोरीला गेला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, कासार गल्ली येथे राहणारे पुष्कराज पांडुरंग केवारे (वय 58) हे आपल्या कुटुंबासह जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी-कोंडणे तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटे उघडून मौल्यवान वस्तूंची शोधाशोध करत चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी घरातील दुचाकी (एमएच 15 एलडी 5030) देखील चोरून नेली. याशिवाय घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही सोबत नेल्याचे समोर आले आहे.
Maharashtra Weather News: महाराष्ट्रात सध्या हवामानाचा लपंडाव सुरू आहे. पहाटे आणि सकाळी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गारठा जाणवत ...
23 तोळे सोने आणि चार लाखांची रोकड चोरीला
14 नोव्हेंबर रोजी रात्री केवारे कुटुंबीय देवदर्शनावरून घरी परतले. त्यावेळी घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि मौल्यवान वस्तू गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरफोडी झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये दोन तोळ्यांचा लक्ष्मीहार, सहा ग्रॅमचे सोन्याचे कानातील टॉप्स, दोन तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस, पाच तोळे वजनाचे 11 जोड सोन्याचे टॉप्स, दहा तोळ्यांच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि एक तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश आहे. यासह एकूण सुमारे 23 तोळे सोने, चार लाख रुपयांची रोकड, दुचाकी आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकूण 12 लाख 99 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच चोरट्यांचा माग काढण्यासाठी हस्तरेषा तज्ज्ञांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. पुष्कराज केवारे यांच्या तक्रारीवरून येवला शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(4) आणि 305 अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा शोध घेऊन चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान आता येवला पोलिसांसमोर आहे.





