Tuesday, November 17, 2026

महेंद्रसिंह धोनीने क्रिकेट कारकिर्दीत एकदा मेंटॉर झाला, पण...! चेन्नई सुपर किंग्ससाठी वेगळं काय करणार?

आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी क्रीडाप्रेमींना एक धक्का बसला आहे. कारण महेंद्रसिंह धोनी आता मैदानात क्रिकेट खेळताना दिसणार नाही. धोनी आता चेन्नई सुपर किंग्सचा मेंटॉर म्हणून भूमिका बजावणार आहे. पण त्याला ही जबाबदारी पार पाडता येईल का? हा प्रश्न पडण्यास कारणंही तसंच आहे.

आयपीएल स्पर्धेतील धोनी पर्वाचा शेवट झाला आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून 2026 पर्यंत धोनी नावाचं वलय या चेन्नई सुपर किंग्सभोवती होतं. कारण त्याच्या चाहत्यांना त्याची मैदानात खेळतानाची एक झलक पाहण्याची संधी मिळत होती. आयपीएल 2008 पासून ते आयपीएल 2026 पर्यंत महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग होता. मात्र आयपीएल 2027 पासून धोनी मैदानात खेळताना दिसणार नाही. कारण महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेतली असून नव्या भूमिकेत दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या मेंटॉरपदी आता महेंद्रसिंह धोनी असणार आहे. म्हणजेच धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत दिसेल, पण त्याची भूमिका बदललेली असणार आहे. आता यष्टीमागून क्रिकेटचा सामना फिरवण्याऐवजी धोनी डगआऊटमधून खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे. धोनी मैदानात नसला तरी चेन्नई सुपर किंग्स त्याचं नातं अबाधित असणार आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने पाच वेळा जेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स म्हणजे धोनी हे नातं घट्ट झालं आहे.

महेंद्रसिंह धोनी मेंटॉर, पण...

आयपीएल 2027 पासून महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्सचा मेंटॉर असणार आहे. धोनी ही भूमिका पहिल्यांदा बजावतोय असा नाही. यापूर्वी टीम इंडियासोबत ही भूमिका बजावली आहे.  पण त्याचा कार्यकाळ हा खूपच कमी अवधीचा होता. टी20 वर्ल्डकप 2021 स्पर्धेसाठी महेंद्रसिंह धोनीची मेंटॉरपदी नियुक्ती केली होती.  या स्पर्धेसाठी विराट कोहली कर्णधार, तर रवि शास्त्री मुख्य प्रशिक्षक होते. मात्र या स्पर्धेतून टीम इंडिया आऊट झाली आणि धोनीचा मेंटॉरपदाचा कार्यकाळही संपला. या स्पर्धेसाठी खेळाडूंना दबावातून बाहेर काढणं आणि त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मेंटॉर म्हणून महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर होती. पण सुपर 12 मध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव झाल्याने उपांत्य फेरीपूर्वीच भारताचा खेळ संपला.

महेंद्रसिंह धोनीकडे मेंटॉरशिप सोपवण्याचं कारण काय?

टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून महेंद्रसिंह धोनीचा कार्यकाळ काही यशस्वी झाला नाही. तरीही चेन्नई सुपर किंग्सने धोनीची नियुक्ती का केली? असा प्रश्न पडणं सहाजिकच आहे. कारण धोनीकडे क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्याच्या सामन्याची रणनिती आखण्याची समज आहे. इतकंच काय तर चेन्नई सुपर किंग्ससोबत दोन दशकांचं नातं आहे. चेन्नई सुपर किंग्ससोबत सुरूवातीला कर्णधार, नंतर खेळाडू आणि आता मेंटॉर म्हणून दिसणार आहे. संघातील खेळाडू, कोचिंग स्टाफ आणि फ्रेंचायझीच्या कार्यशैलीबाबतही माहिती आहे. त्यामुळे त्याच फायदा नक्कीच फ्रेंचायझीला होऊ शकतो. आता आयपीएल 2027 मध्ये चेन्नई सुपर किंग्सला जुने दिवस पुन्हा येतील का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >