
Crime News: वैद्यकीय उपकरण पुरवठा करणाऱ्या कंपनीची थकीत बिले मंजूर करण्यासाठी 7.5 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य कामगार विमा योजनेतील लेखा अधिकारी आणि सहाय्यक संचालक जितेंद्र साखरकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. सापळा रचून कारवाई करताना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. या कारवाईनंतर साखरकर यांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्यांच्या घराची झडती सुरू आहे.
थकीत बिलांसाठी मागितली 7.5 लाखांची लाच
ACB कडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वैद्यकीय उपकरण पुरवठा करणाऱ्या कंपनीला कार्यालयाकडून 4 फेब्रुवारी 2026 आणि 13 ऑक्टोबर 2026 रोजी एकूण 16.28 कोटी रुपयांच्या उपकरण पुरवठ्याचे कार्यादेश देण्यात आले होते. त्यानुसार कंपनीने उपकरणांचा पुरवठा करून बिले मंजुरीसाठी कार्यालयात सादर केली होती. ( Jitendra Sakharkar)
मात्र, गेल्या सात महिन्यांपासून ही बिले प्रलंबित होती. त्यासाठी तक्रारदार संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करत होते. याचदरम्यान, बिले मंजूर झाल्यानंतर पैसे द्यावे लागतील, अशी मागणी अधिकाऱ्याने केल्याचा आरोप आहे.
50 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले
16 नोव्हेंबर 2026 रोजी संबंधित कार्यालयाकडून 7.5 कोटी रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले. त्यानंतर साखरकर यांनी तक्रारदाराला कार्यालयात बोलावून केलेल्या कामाच्या मोबदल्यात 7.5 लाख रुपये मागितल्याची तक्रार ACB कडे करण्यात आली. ( Corruption News)
तक्रारीच्या पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ACB ने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे 16 नोव्हेंबर रोजी 50 हजार रुपये स्वीकारताना साखरकर यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
मोबाईल जप्त; घराची झडती सुरू
कारवाईदरम्यान आरोपी अधिकाऱ्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.






