
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर अनेक कामांसाठी केला जात असताना, त्याचा गैरवापर करून रेल्वेची फसवणूक केल्याचा प्रकार विरारमध्ये समोर आला आहे. एका प्रवाशाने ChatGPT च्या मदतीने सामान्य फर्स्ट क्लास लोकल पासमध्ये फेरफार करून तो सहा महिन्यांच्या AC लोकल पाससारखा बनवल्याचा आरोप आहे. या बनावट पासच्या आधारे त्याने जवळपास महिनाभर प्रवास केला. मात्र, पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासकांनी संशय आल्याने त्याची तपासणी केली आणि फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
आयपीएल स्पर्धेचं 20वं पर्व वर्ष 2027 मध्ये पार पडमार आहे. या स्पर्धेसाठी दहा संघांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. फ्रेंचायझींनी ट्रेड विंडोच्या माध्यमातून ...
अमन ओमप्रकाश यादव याने विरार ते बोरिवली दरम्यान प्रवासासाठी एक महिन्याचा फर्स्ट क्लास पास घेतला होता. मात्र, त्याने कथितरित्या ChatGPT चा वापर करून पासवरील प्रवासाचा वर्ग, वैधतेची तारीख आणि भाड्याची माहिती बदलली. त्यानंतर हा पास सहा महिन्यांसाठी AC लोकलचा असल्याचे भासवण्यात आले.
टीसींना पासबाबत संशय कसा आला?
गेल्या आठवड्यात चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये वसई रोड आणि नायगावदरम्यान टीसींनी यादव यांच्याकडे पासची मागणी केली. त्यावेळी त्याने मोबाईलवर डिजिटल पास दाखवला. मात्र, हा पास रेलवन ॲपमधील मूळ तिकीट नसून स्क्रीनशॉट असल्याचे टीसींच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पासची सत्यता तपासण्याचा निर्णय घेतला.
रेल्वेच्या यंत्रणेतून बनावट पास उघड
टीसींनी पासवरील क्रमांक रेल्वेच्या हँडहेल्ड उपकरणात तपासला. त्यावेळी मूळ पास विरार ते बोरिवली प्रवासासाठी फर्स्ट क्लासचा असून, त्याची वैधता 3 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2026 अशी असल्याचे समोर आले. मात्र, यादवने डिजिटल कागदपत्रात बदल करून त्याची वैधता 3 ऑक्टोबर 2026 ते 2 मार्च 2027 अशी दाखवली होती.
सुरुवातीला त्याने मित्राने रेलवन ॲपवरून पास काढल्याचे सांगितले. मात्र, चौकशीदरम्यान ChatGPT च्या मदतीने पासमधील माहिती बदलल्याचे त्याने कबूल केल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे.
त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने त्याला ताब्यात घेतले आणि वसई रेल्वे पोलीस ठाण्यात नेण्यात आले. बनावट डिजिटल पास वापरून पश्चिम रेल्वेची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर रेल्वेने डिजिटल पासची सत्यता तपासण्यासाठी टीसींना अधिक दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बनावट तिकिटे ओळखण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे.






