Wednesday, November 18, 2026

इन्स्टाग्रामवर ओळख अन् मुंबईत भेटीचा प्लॅन! झारखंडहून एकट्या आलेल्या 17 वर्षीय मुलीचा GRP ने घेतला शोध

इन्स्टाग्रामवर झालेल्या फ्रेंडशिपसाठी झारखंडमधून घर सोडून एकटीच मुंबईत आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने बचावली. जालन्यावरून येणार्‍या इन्स्टाग्रामवरील मित्राला भेटण्यासाठी ती दादर रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. मात्र, कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

मुंबई: सोशल मीडियावर केलेली फ्रेंडशिप एका अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतली आहे. इयत्ता 12 वी मध्ये शिकत असलेल्या मुलीने इन्स्टाग्रामवर एका मुलासोबत केलेल्या फ्रेंडशिपसाठी त्याला भेटण्यासाठी ती झारखंडवरून मुंबईमध्ये आली होती. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर घडला आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या फ्रेंडशिपसाठी थेट घर सोडून झारखंडवरून मुंबईत आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लोहमार्ग पोलिसांनी (GRP) आणि बाल कल्याण संस्थांच्या मदतीने दादर रेल्वे स्थानकातून शिताफीने शोधून काढले. या कारवाईमुळे एका मोठ्या संकटातून या मुलीचा बचाव झाला आहे.

नेमकं काय घडलं होता प्रकार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी झारखंडमधील असून ती इयत्ता 12 वी मध्ये शिकते. इन्स्टाग्रामवर तिची एका मुलाशी मैत्री झाली होती. या मैत्रीच्या आहारी जाऊन तिने घर सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला. ती झारखंडमधून एका लांब पल्ल्याच्या ट्रेनने एकटीच प्रवास करून 16 नोव्हेंबर रोजी थेट मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात येऊन पोहोचली. जालन्यावरून तिचा हा इन्स्टाग्रामवरील मित्र तिला भेटण्यासाठी येणार होता, त्यामुळे ती त्याच्या प्रतीक्षेत दादर स्थानकावरील एका बाकड्यावर बसून होती.

कुटुंबीयांची धावपळ आणि पोलिसांची सतर्कता

दरम्यान, मुलगी घरी न दिसल्याने तिच्या कुटुंबीयांची तारांबळ उडाली. त्याचवेळी त्या मुलीने स्वतःचे काही फोटो आपल्या घरच्यांना व्हॉट्सॲपवर पाठवले. फोटोवरून ती मुंबईत असल्याचा अंदाज आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तातडीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. यानंतर मुंबई लोहमार्ग पोलिसांना (GRP) मानवी तस्करी विरोधी पथकाकडून याबद्दलची गुप्त माहिती मिळाली. तसेच 'रेल मदद' पोर्टलच्या माध्यमातून रेल्वे सुरक्षा दलाला (RPF) देखील याबाबतचा सतर्कतेचा संदेश मिळाला होता.

पोलिसांची तातडीची कारवाई

माहिती मिळताच GRP, रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि बाल कल्याण संस्था जसे की 'चाइल्ड हेल्पलाइन' आणि 'रेलवे चिल्ड्रन्स इंडिया'च्या पथकाने तात्काळ सूत्रे हलवून त्या मुलीचा कसून शोध घेतला असता, दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 13 आणि 14 वर ही मुलगी सुस्थितीत बसल्याचे आढळले. पोलिसांनी तिला त्वरित ताब्यात घेतले. दादर जीआरपी चौकीत सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, त्या मुलीला प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर बालकल्याण समितीच्या (CWC) मार्गदर्शक सूचनांनुसार तिच्या सुरक्षिततेची काळजी घेत तिला एका बालगृहात (चिल्ड्रन्स होम) दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून घटनेची अधिक सविस्तर चौकशी केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा