नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी लतीफ भट याला सुरक्षा दलांनी ठार केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जवानांचे कौतुक केले आहे. लतीफ भट हा खोऱ्यातील लश्कर-ए-तैयबाचा शेवटचा सक्रिय स्थानिक दहशतवादी होता, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. या कारवाईत जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि गुप्तचर यंत्रणांनी संयुक्तपणे सहभाग घेतला.
बुधवारी पहाटे कुलगाम परिसरात सुरक्षा दलांनी संयुक्त ऑपरेशन राबवले. या कारवाईत लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी लतीफ भट याला ठार करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय आणि नियोजन महत्त्वाचे ठरल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत सुरक्षा दलांच्या कामगिरीचे कौतुक केले. सर्व सुरक्षा यंत्रणांमध्ये उत्कृष्ट समन्वय दिसून आला असून, या संयुक्त कारवाईमुळे दहशतवादाविरोधातील मोहिमेला महत्त्वपूर्ण यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
एक दिवस आधी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा
या कारवाईपूर्वी कुलगाममध्ये दहशतवादी उमर निसार यालाही सुरक्षा दलांनी ठार केले होते. लतीफ भटचा साथीदार असलेल्या उमर निसारचा एक दिवस आधी खात्मा करण्यात आल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. या दोन्ही कारवायांमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि गुप्तचर यंत्रणांनी एकत्रितपणे काम केले.
भारतीय जवानांकडून कुलगाम हल्ल्याच्या सुत्रधाराचा खात्मा, सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली A टू Z माहिती
मुंबई: जम्मु- काश्मीरमध्ये, सुरक्षा दलाच्या जवानांकडून दक्षिण काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा लष्कर कमांडर लतीफ भटचा एन्काऊंटर ...
सुरक्षा दलांच्या शौर्याला सलाम
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व जवानांचे अभिनंदन केले. देश या शूर जवानांना सलाम करतो, असे त्यांनी म्हटले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर कुलगाममधील ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. लश्कर-ए-तैयबाच्या स्थानिक दहशतवादी नेटवर्कविरोधात सुरक्षा यंत्रणांकडून सुरू असलेल्या मोहिमेत या कारवाईमुळे मोठे यश मिळाल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला आहे.