नवी दिल्ली : देशातील पोल्ट्री व्यावसायिक आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बर्ड फ्लू अर्थात H5N1 विषाणूपासून कोंबड्यांचे संरक्षण करण्यासाठी भारताने पहिली स्वदेशी लस विकसित केली आहे. भोपाळ येथील ICAR-राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने (NIHSAD) ही लस तयार केली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान २० नोव्हेंबर रोजी या लसीचे राष्ट्रार्पण करणार आहेत.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे ती H5N1 च्या क्लेड 2.3.2.1A या विषाणू प्रकाराविरोधात विकसित करण्यात आली आहे. ही निष्क्रिय (Inactivated) लस असून, भारतात या विशिष्ट विषाणू प्रकाराविरोधात विकसित झालेली पहिली स्वदेशी लस असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
बर्ड फ्लूचा पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका
HPAI म्हणजेच हायली पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएंझा या आजाराला सामान्यतः बर्ड फ्लू म्हणून ओळखले जाते. हा पक्ष्यांना होणारा अत्यंत गंभीर संसर्गजन्य आजार आहे. या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू होऊ शकतो. संसर्ग रोखण्यासाठी अनेकदा बाधित पक्ष्यांना नष्ट करावे लागते. तसेच व्यापारावर निर्बंध येत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. २००६ मध्ये भारतात पहिल्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला होता. त्यानंतर देशात H5N1 आणि H5N8 या विषाणू प्रकारांचे मिळून ५०० हून अधिक प्रादुर्भाव नोंदवण्यात आले आहेत.
Mumbai Airport News: ना विमान, ना माहिती! मुंबई विमानतळावर स्पाईसजेटच्या प्रवाशांचा संताप
Mumbai Airport News: देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर मंगळवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून शेकडो प्रवासी अडकून पडले आहेत. मुंबई ...
बर्ड फ्लूमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही धोका
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, बर्ड फ्लूचा मोठा उद्रेक झाल्यास भारताच्या जीडीपी वाढीवर १.५ टक्क्यांपर्यंत परिणाम होऊ शकतो. हा आजार नियंत्रणाबाहेर गेल्यास देशातील २० टक्क्यांहून अधिक पोल्ट्री पक्ष्यांना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. २००६ मधील बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे भारताला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात अंदाजे २,२०० ते ३,००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मणिपूरमध्ये झालेल्या एका प्रादुर्भावामुळे राज्याच्या जीडीपीच्या सुमारे ०.५ टक्क्यांइतके आर्थिक नुकसान झाल्याचेही समोर आले होते.
माणसांमध्येही संसर्गाचा धोका
बर्ड फ्लूचा धोका केवळ पक्ष्यांपुरता मर्यादित नाही. H5N1 विषाणूचा संसर्ग विविध प्राण्यांमध्ये, विशेषतः सस्तन प्राण्यांमध्येही आढळला आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात माणसांमध्येही या संसर्गाची तीन प्रकरणे समोर आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, २००३ पासून भारतासह जगातील २५ देशांमध्ये H5N1 संसर्गाची १,००३ मानवी प्रकरणे नोंदवली गेली असून, त्यापैकी ४७९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरते.
Winter Clothes Care Tips : हिवाळ्यात स्वेटर आणि गरम कपड्यांना येतोय कुबट वास ? धुण्याआधी करा हे 3 सोपे उपाय, कपडे राहतील फ्रेश
Winter Clothes Care Tips : हिवाळ्याची चाहूल लागताच कपाटातून स्वेटर, जॅकेट, शाल आणि इतर उबदार कपडे बाहेर काढले जातात. मात्र, अनेक महिने कपाटात बंद ठेवलेल्या या ...
स्वदेशी लस का महत्त्वाची ?
सध्या H5N1 विषाणूच्या क्लेड 2.3.2.1A या प्रकारापासून संरक्षण देणारी विशिष्ट व्यावसायिक लस उपलब्ध नसल्याचे केंद्र सरकारने नमूद केले आहे. त्यामुळे भारतातच स्वदेशी लस विकसित करण्याची गरज निर्माण झाली होती. ICAR-राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने विकसित केलेली ही लस देशात आढळणाऱ्या H5N1 विषाणूच्या विशिष्ट प्रकारापासून कोंबड्यांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.
यामुळे पोल्ट्री क्षेत्रातील आर्थिक नुकसान कमी करण्यास आणि पक्ष्यांमधून इतर प्राणी व माणसांपर्यंत विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
२० नोव्हेंबर रोजी या लसीचे राष्ट्रार्पण झाल्यानंतर तिच्या वापरासंदर्भातील पुढील प्रक्रिया आणि उपलब्धतेकडे पोल्ट्री व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. भारताच्या पशुसंवर्धन आणि पोल्ट्री क्षेत्रासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.