Thursday, November 19, 2026

Mumbai Tunnel Project : मुंबईच्या वाहतूक कोंडीवर ‘पाताळ लोक’चा उतारा!

वांद्रे-वरळी ते विमानतळ आणि पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारी ३१ किमीची बोगदा प्रणाली; उत्तन-विरार सागरी मार्गाचाही सुधारित आराखडा

मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी आता जमिनीखालून रस्त्यांचे जाळे उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतू, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), मुंबई विमानतळ आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडणाऱ्या सुमारे ३१ किलोमीटर लांबीच्या एकात्मिक रस्ता बोगदा प्रणालीचा (पाताळ लोक) आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गुरुवारी सादर केला. त्याचबरोबर मुंबई-वाढवण द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या भाईंदर/उत्तन ते विरार या सागरी मार्गाचे सुधारित आरेखनही मांडण्यात आले. या दोन्ही प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील पूर्व-पश्चिम जोडणी अधिक सक्षम होण्यासह प्रस्तावित रिंगरोडचे जाळेही विस्तारण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी वर्षा या शासकीय निवासस्थानी या दोन्ही प्रकल्पांसंदर्भात बैठक झाली. यावेळी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले. एकात्मिक बोगदा प्रणालीमुळे मुंबईतील महत्त्वाची व्यावसायिक केंद्रे, विमानतळ आणि प्रमुख महामार्ग एकमेकांना थेट जोडण्याचे नियोजन आहे. या मार्गाचा एका दिशेचा विस्तार सुमारे ३१ किलोमीटर असेल. वांद्रे-वरळी सागरी सेतूपासून सुरू होणारी ही जोडणी बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानक, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल-२, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत पोहोचणार आहे. या मार्गावर प्रवेश आणि निर्गमन मार्गांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सध्या मुंबईच्या पश्चिम भागातून पूर्व उपनगरांकडे किंवा बीकेसी आणि विमानतळाच्या दिशेने जाण्यासाठी प्रवाशांना अनेकदा गर्दीच्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो. त्यात सिग्नल, वाहनांची मोठी संख्या आणि विविध मार्गांवरील वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढतो. प्रस्तावित बोगदा प्रणालीमुळे महत्त्वाच्या मार्गांना थेट जोडणी मिळणार असल्याने या वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः बीकेसी, विमानतळ आणि पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्ग यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, मुंबई-वाढवण द्रुतगती मार्गाशी जोडणी प्रस्थापित करण्यासाठी भाईंदर/उत्तन ते विरार या सागरी सेतू प्रकल्पाचाही सुधारित आराखडा बैठकीत सादर करण्यात आला. या प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. आता या मार्गाच्या आरेखनाचे दोन पर्याय मांडण्यात आले असून, त्यावर बैठकीत चर्चा झाली. या जोडणीमुळे मुंबईच्या उत्तरेकडील भागातील वाहतूक संपर्क अधिक सक्षम होण्याबरोबरच वाढवण बंदराच्या दिशेने जाणाऱ्या द्रुतगती मार्गालाही पर्यायी जोडणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

या दोन्ही प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशात प्रस्तावित असलेल्या रिंगरोडची जोडणी अधिक सक्षम होणार आहे. शहराच्या विविध भागांतील प्रवासाचा वेळ कमी करणे, प्रमुख व्यावसायिक केंद्रे आणि वाहतूक सुविधांमधील अंतर कमी करणे तसेच रस्त्यांवरील वाहतुकीचे विकेंद्रीकरण करणे, हा या प्रकल्पांमागील उद्देश आहे. बैठकीला नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक व गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >