Thursday, November 19, 2026

Nashik : "...और एक वकालतनामा रेडी रख" ; 'त्या' ऑडिओ क्लिपमुळे नाशिक TCS प्रकरणात ट्विस्ट ! इम्तियाज जलील यांची आज न्यायालयात हजेरी

निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातून नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पडद्यामागे वेगाने हालचाली घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नाशिक : नाशिकमधील TCS कंपनीतील तरुणीवरील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्नांच्या प्रकरणात तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. मुख्य संशयित निदा एजाज खान हिला फरार असताना आश्रय देण्यासाठी विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आल्याचा दावा विशेष तपास पथकाने (SIT) केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल्स, खोल्या आणि स्वतंत्र घरांमध्ये तिला लपवून ठेवण्यात आल्याचे तपासातून समोर आल्याची माहिती आहे. या प्रकरणात माजी खासदार आणि एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे.

इम्तियाज जलील यांची आज न्यायालयात हजेरी

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवला आहे. सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, मुख्य संशयित निदा एजाज खान हिला पसार काळात केवळ एका खोलीतच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhajinagar) विविध हॉटेल्स, खोल्या आणि स्वतंत्र घरांमध्ये लपवून ठेवण्यात आल्याचा उलगडा विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) (SIT) तपासात झाला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी (दि. १९) माजी खासदार तथा एमआयएम नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) हे नाशिक सत्र न्यायालयात व्यक्तिशः हजर राहणार आहेत. निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातून नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पडद्यामागे वेगाने हालचाली घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ऑडिओ क्लिपमुळे प्रकरणाला नवे वळण

एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आणि इम्तियाज जलील यांच्यात झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांना मिळाल्याची माहिती आहे. ‘साहब… निदा और उसके फॅमिली को नाशिक पुलिस ले गई हैं…’ अशी माहिती पटेल यांनी दिल्यावर जलील यांनी ‘हाँ, मतीन तुम अभी कुछ दिन के लिए शांत हो जा… और एक वकालतनामा रेडी रख’ असा सल्ला दिल्याचे सूत्रांकडून समजते. हे रेकॉर्डिंग आणि इतर तांत्रिक पुरावे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी दोषारोपपत्रात समाविष्ट केले आहेत.

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात एका अविवाहित पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिचे सहकारी संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांच्याविरुद्ध बलात्कार, विनयभंग व धर्मांतराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल होताच निदा पसार झाली होती. तिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरातील नगरसेवक मतीन पटेल व घरमालक हानिफ शेख यांना अटक करण्यात आली. त्यांच्या सखोल चौकशीतून या प्रकरणाचे धागेदोरे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांचाही सहसंशयित म्हणून समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे, निदाला पसार काळात मदत केल्याप्रकरणी तिचे आई-वडील, भाऊ आणि मावशीलाही पोलिसांनी सहसंशयित केले.

न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवला असून, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दाखल केलेले दुसरे पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयाने पटलावर घेतले असून, त्यावर गुरुवारी (दि. १९) सुनावणी होणार आहे. सध्या प्रमुख संशयित दानिश शेख वगळता उर्वरित सर्व संशयित सशर्त जामिनावर बाहेर आहेत.

या प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्रात एकूण ११ संशयितांचा समावेश असल्याची माहिती आहे.

मूळ प्रकरणातील संशयित : दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा एजाज खान

राजकीय आणि इतर आश्रयदाते म्हणून नमूद संशयित : इम्तियाज जलील, मतीन पटेल, हानिफ शेख, सादिक बशिर खान

कौटुंबिक सहसंशयित : एजाज बशिर खान (वडील), निलोफर एजाज खान (आई), महंमद एजाज खान (भाऊ), नूरजहाँ शेख (मावशी)

नाशिक TCS प्रकरणात आश्रयदाते, राजकीय संपर्क आणि तांत्रिक पुरावे यामुळे तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. आता न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत कोणते मुद्दे समोर येतात आणि SIT तपासातून आणखी कोणते खुलासे होतात, याकडे नाशिकसह राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >