Thursday, November 19, 2026

अकवान चक्रीवादळाचा ओडिशाला धोका; 46 हजारांहून अधिक नागरिक सुरक्षितस्थळी हलवले

अकवान चक्रीवादळामुळे ओडिशात प्रशासन अलर्टवर आहे. १४ जिल्ह्यांना वादळ आणि मुसळधार पावसाचा धोका असून, आतापर्यंत ४६,७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ११ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून बचाव पथके आणि चक्रीवादळ निवारा केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत.

अकवान चक्रीवादळाने अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील अकवान या तीव्र चक्रीवादळाचा केंद्र गुरुवारी पहाटे २:३० वाजता गोपालपूरच्या दक्षिणेला ५८० किमी आणि पुरीच्या दक्षिणेला ६४० किमी अंतरावर होते. त्यामुळे ओडिशातील ४६,७०० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी आंध्र प्रदेशातील नरसपूर आणि पूर्वेकडील राज्यातील पुरी दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. वादळाचा वेग आणि दिशा सतत बदलत असल्याने गुरुवारपर्यंत त्याच्या मार्गाचे आणि संभाव्य परिणामांचे अधिक स्पष्ट चित्र समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, हे वादळ नरसपूरच्या पूर्व आग्नेय दिशेला सुमारे ४७० किमी, आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणमच्या दक्षिण आग्नेय दिशेला ४९० किमी आणि चेन्नईच्या पूर्व ईशान्य दिशेला ५७० किमी अंतरावर होते. मुख्यमंत्री मोहन चरण माळी यांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेतल्याने राज्य सरकारने तयारीची पावले उचलली आहेत.किमान १४ जिल्हे चक्रीवादळ आणि पावसामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. सरकारने आतापर्यंत ११ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून गंजम, मलकानगिरी, रायगडा, कोरापुट आणि कालाहंडी या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत किमान ४६,७०१ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, तर ४४८ चक्रीवादळ निवारा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून आणखी ३००० केंद्रे तयार केली जात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती आणि मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. तर भूस्सखलनाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर डोंगराळ भागातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी ओडिशा आपत्कालीन जलद कृती दलाची तब्बल ६० पथके आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाची १४ पथके तैनात करण्यात आली आहेत.

चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, नऊ जिल्ह्यांमधील शाळा आणि अंगणवाडी केंद्रे गुरुवार आणि शुक्रवारी बंद राहतील. तसेच, पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे, राज्य निवड मंडळाने (SSB) आपल्या नियोजित भरती परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. जलसंपदा विभागाच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शुक्रवार ते रविवार या कालावधीत विविध जिल्ह्यांतील नद्यांच्या पाणीपातळीवर आणि पूरस्थितीच्या जोखमीवर लक्ष ठेवण्याची, तसेच 'इंजिनिअर-इन-चीफ' (मुख्य अभियंता) यांच्याशी समन्वय साधून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >