अमेरिकेतील एका निर्णयामुळे सोन्याच्या दरात पडझड? सोन्याचे दर 10 हजारांनी कमी झाले...

नोव्हेंबर महिन्यामध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंजकडून आलेल्या आकडेवारीनुसार, सोन्याच्या दरात 7.40 टक्क्यांनी, म्हणजेच 10,372 रुपयांची घट झालेली पाहायला मिळत आहे.

मुंबई: नोव्हेंबर महिन्यामध्ये सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण होताना दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजकडून आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 18 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 7.40 टक्क्यांनी, म्हणजेच 10,372 रुपयांची घट झालेली पाहायला मिळत आहे. तर, चांदीच्या दरातही लक्षणीय घट झालेली आहे. चांदीच्या दरात 19,000 रुपयांपेक्षा सर्वाधिक घसरण झालेली आहे. देशाच्या वायदा बाजार (Futures Market) मध्ये चांदीच्या दरात अंदाजे 10.55 टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळत आहे.


आता सर्वात मोठा प्रश्न अस की, सोन्या- चांदीच्या किमतींमध्ये इतकी मोठी घसरण कशी झाली? इराण युद्ध संपण्याची चिन्हे दिसू लागल्याने सोन्या- चांदीच्या किमती वाढतील, अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात मात्र, अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांमध्ये महागाई गगनाला भिडत आहे. याच कारणामुळे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक आपल्या डिसेंबरमधील धोरण बैठकीत व्याजदर वाढवू शकते.






दरम्यान, डॉलर निर्देशांक गेल्या 20 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहे. शिवाय, अमेरिकी बॉण्डवरील परतावा 5% पेक्षा जास्त राहिल्याने सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव येण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की, अमेरिकेतील विविध घडामोडी सोने आणि चांदीच्या किमतींमधील घसरणीला कारणीभूत ठरत आहेत. भारताच्या मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वायदे बाजारात नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळाली. भारतामध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरामध्ये वाढ न होता, काही प्रमाणात घट झालेली पाहायला मिळाली. यामुळे फक्त ग्राहकच नाही तर, सर्व ज्वेलर्स मालक सुद्धा अचंबित झाले होते.


आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये सोन्याच्या दरात 7.40 % म्हणजेच प्रति 10 ग्रॅम ₹10,372 ची घसरण झालेली पाहायला मिळाली. या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी सोन्याचा भाव प्रति तोळा, 10 ग्रॅम ₹1 लाख 40 हजार 186 इतका होता. 18 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा अर्थात 10 ग्रॅम ₹1 लाख 29 हजार 814 पर्यंत घसरला. विशेष म्हणजे, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली. 5 नोव्हेंबरपर्यंत, भावात 4.05% म्हणजेच प्रति 10 ग्रॅम ₹5610 ची वाढ झाली होती. तेव्हापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.


दुसरीकडे, सोन्याप्रमाणेच नोव्हेंबर महिन्यामध्ये चांदीच्या दरातही लक्षणीय घसरण होताना दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये देशातील वायदे बाजारात चांदीच्या दरात 10.55 टक्क्यांनी घट झालेली पाहायला मिळाली. आकडेवारीनुसार, 30 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव प्रति किलो ₹1 लाख 79 हजार 698 इतका होता, जो 18 नोव्हेंबर रोजी प्रति किलो ₹1 लाख 60 हजार 734 इतका आहे. मोठ्या प्रमाणावर किंमतीमध्ये घट झाल्यामुळे ज्वेलर्स मालकांना तोटा सहन करावा लागत असून ग्राहकांसाठी कमी दर होणे म्हणजे, दिलासा आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये चांदीच्या दरात प्रति किलो ₹18,964 ची घट झाली आहे. तथापि, सुरुवातीच्या दिवसांमध्ये चांदीच्या दरात वाढ दिसून आली होती. 5 नोव्हेंबरपर्यंत चांदीच्या दरात 4.47 %ने, म्हणजेच प्रति किलोग्राम ₹8008 ने वाढ झाली होती.






अमेरिकेमुळे सोन्या-चांदीचे भाव घसरले का?


डॉलर निर्देशांक: आकडेवारीनुसार डॉलर निर्देशांक 103.78 या 20 वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे. गेल्या पाच दिवसांत डॉलर निर्देशांकात 0.89%, एका महिन्यात 2%, तीन महिन्यांत 5%, चालू वर्षात 5.60% आणि एका वर्षात 3.59% वाढ झाली आहे. यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव आला आहे.


बॉन्ड यील्ड्स: बॉन्ड यील्डच्या आकडेवारीप्रमाणे सोन्यावरील दबावात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. 5 वर्षांच्या बॉन्डचे उत्पन्न 4.899%, 10 वर्षांच्या बॉन्डचे उत्पन्न 5.085% आणि 30 वर्षांच्या बॉन्डचे उत्पन्न 5.434% आहे. हे दर सोने आणि चांदीच्या किमतींमधील घसरणीत दिसून येत आहे.


फेडकडून व्याजदरवाढीची शक्यता: दरम्यान, अमेरिकेतील महागाईमुळे फेडकडून व्याजदरवाढीची अपेक्षा निर्माण करण्यात आली आहे. 'फेड वॉच'नुसार, 96% लोकांना व्याजदरात 25 बेसिस पॉईंट वाढीची अपेक्षा आहे. यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत घट झाली आहे.






विदेशी बाजारात सोन्या-चांदीची स्थिती काय आहे?


परदेशी बाजारात सोन्याच्या दरातही मोठी घसरण होत आहे. कॉमेक्स गोल्ड फ्युचर्स प्रति औंस $122.30 ने घसरून $3,741.90 वर व्यवहार करत आहेत, तर स्पॉट सोन्याचे दर प्रति ओंस $3,725.58 वर स्थिर आहेत. दुसरीकडे, ब्रिटिश बाजारात सोन्याचे भाव प्रति ओंस 2,832.82 पाउंडवर स्थिर आहे, तर युरोपियन बाजारात सोन्याचा भाव प्रति ओंस 3,394.92 युरोवर स्थिर आहे. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास, कॉमेक्स बाजारात भविष्यामध्ये चांदीची किंमत जवळपास 5 टक्क्यांनी घसरून 45.06 डॉलर प्रति ओंस होणार आहे. स्पॉट चांदीच्या किमतीदेखील 5 टक्क्यांनी घसरून 45.07 डॉलर प्रति ओंस होत आहेत. ब्रिटिश बाजारात चांदीचा भाव प्रति ओंस 34.2683 पाउंडवर स्थिर होते, तर युरोपीय बाजारात चांदीचे भाव प्रति ओंस 41.0540 युरोवर स्थिर होते.


सेबी-नोंदणीकृत कमोडिटी चलन बाजार तज्ज्ञ अनुज गुप्ता यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सोने- चांदीच्या किंमती पुढचे काही दिवस घसरत राहण्याची शक्यता आहे. त्यांनी नमूद केले की, डॉलर निर्देशांक 20 वर्षांतील उच्चांकाच्या जवळ पोहोचत आहे. दरम्यान, यूएस बाँड यील्ड सध्या 5% आणि त्याहून अधिकच्या आसपास आहे. यावेळी फेडकडून आणखी 0.25% व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे. हे तिन्ही घटक अमेरिकेतून येत आहेत, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमती पुढील काही दिवस कमी राहण्याची शक्यता आहे. त्यांनी पुढे सांगितले की, येत्या काही दिवसांत सोन्याचा भाव सुमारे 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर चांदीच्या किमती 1.50 रुपयांच्या खालीही घसरण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांच्या सूचना अन् महापालिका सभागृह भरले घड्याळाच्या काट्यावर; काल नेमकं BMC च्या सभागृहात काय घडलं

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेचे सभागृह हे मागील काही महिन्यांपासून नियोजित वेळेत सुरु न करता एक ते

आरे कॉलनतील आदिवासी जनतेला घराजवळ आरोग्य सुविधा, आरे रुग्णालय ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सुधार समितीत मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): आरे कॉलनीतील आदिवासी जनतेसह स्थानिकांना आरोग्य सेवा आता मिळणार असून आरे रुग्णालय

बांगलादेशमध्ये पुन्हा आगडोंब, राजधानी ढाकामध्ये नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ

मुंबई: बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडताना दिसत आहे. बांगलादेशच्या माजी

चातुर्मास संपणार, शुभकार्यांना सुरुवात! देवूठनी एकादशीची तारीख आणि पूजा विधी

Devutthani Ekadashi 2026: कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला 'देवउठनी एकादशी' किंवा 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हणतात.

Rasika Vengurlekar New Home: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रसिका वेंगुर्लेकरचं घराचं स्वप्न पूर्ण; नव्या घराचा गृहप्रवेश!

Rasika Vengurlekar New Home: मुंबईत आपलं स्वतःच हक्काचं घर असावं अस प्रत्येकाचं स्वप्न असत. त्यासाठी सगळेचजण दिवसरात्र मेहनत घेत

Western Express Highway Bike Stunt: वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जीवघेणे बाईक स्टंट; व्हायरल व्हिडिओनंतर 5 तरुणांना अटक!

Western Express Highway Bike Stunt: महाराष्ट्रातील मुंबई शहरात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काही बाईकस्वार धोकादायक स्टंट करतांना आणि