
मुंबई : पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक महिने शारीरिक चाचणीची तयारी करणाऱ्या तरुणींसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी सुरू असल्यामुळे धावणे किंवा अन्य शारीरिक चाचण्या देण्यात अडचण येणाऱ्या उमेदवारांना आता आणखी एक संधी मिळणार आहे. अशा तरुणींची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना शारीरिक चाचणीसाठी पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ दिली जाणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी केली. त्यामुळे मासिक पाळीच्या त्रासामुळे पोलीस भरतीची संधी गमावण्याची भीती असलेल्या तरुणींना दिलासा मिळणार आहे. (Police Bharati)
मुंबई : प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवरील १०१ अतिक्रमित बांधकामांवर तोडकाम करण्यासाठी आलेल्या रेल्वेच्या पथकाला ...
पोलीस भरतीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षेबरोबरच कठीण शारीरिक चाचण्यांनाही सामोरे जावे लागते. यासाठी तरुणी अनेक महिने मैदानावर सराव करतात. मात्र, ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी सुरू झाल्यास काहींना तीव्र पोटदुखी, कंबरदुखी, थकवा आणि अशक्तपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे धावणे, गोळाफेक आणि लांब उडी यांसारख्या चाचण्यांमध्ये अपेक्षित कामगिरी करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
मासिक पाळीच्या काळात प्रत्येक तरुणीला होणारा त्रास वेगवेगळा असतो. काहींना तीव्र वेदना, चक्कर, मळमळ आणि अशक्तपणाचा त्रास होतो. तर काहींना शारीरिक हालचाली करताना अडचणी येतात. विशेषतः १०० मीटर आणि ८०० मीटर धावण्याच्या चाचण्यांमध्ये वेग आणि शारीरिक क्षमता टिकवून ठेवणे कठीण होऊ शकते. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून, त्याचा परिणाम भरतीतील संधीवर होऊ नये, या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले. ( Maharashtra Government)
नियम काय?
या निर्णयानुसार, मासिक पाळीमुळे शारीरिक चाचणी देता न येणाऱ्या उमेदवारांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. त्यानंतर संबंधित तरुणींना पाच ते सहा दिवसांचा अतिरिक्त कालावधी देऊन शारीरिक चाचणीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.






