मुंबई: रस्त्यावर हॉर्न वाजवला या किरकोळ कारणावरून कर्तव्य बजावणाऱ्या एसटी चालकाला काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी मारहाण केली. ही गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेची परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित हल्लेखोरांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांना देण्यात आले आहेत.
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
“एसटीचे चालक आणि वाहक ऊन, पाऊस, दिवस-रात्र यांची तमा न बाळगता लाखो प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. अशा कर्मचाऱ्यांना एकटे आणि दुबळे समजून त्यांच्यावर हात उगारणाऱ्या अपप्रवृत्तींनी ही बाब गांभीर्याने लक्षात घ्यावी. एसटी कर्मचारी कधीही एकटे नाहीत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कर्मचाऱ्यांच्या सन्मानाला आणि सुरक्षिततेला बाधा आणणारी कोणतीही गुंडगिरी महामंडळ कदापि खपवून घेणार नाही. अशा घटना घडल्यास संबंधित कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता अथवा दबावाखाली न येता तातडीने एसटी महामंडळाच्या मुख्यालयाशी संपर्क साधून आपली बाजू मांडावी. महामंडळाकडून त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.” असे प्रताप सरनाईक म्हणाले.
पुढे बोलताना, गणवेश परिधान करून शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यावर हात उगारणे ही केवळ मारहाणीची घटना नसून, शासकीय यंत्रणेच्या प्रतिष्ठेवर आणि कायद्याच्या अधिकारावर केलेला हल्ला आहे. अशा घटनांमुळे एसटीच्या चालक-वाहकांचे मनोधैर्य खच्ची होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
Bigg Boss 20 Extension: TRP चा धमाका! 'बिग बॉस 20' आणखी 2 ते 4आठवडे वाढणार?
Bigg Boss 20 Extension: सर्वाधिक चर्चेत असणारा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 20’ बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. 6 सप्टेंबर 2026 रोजी सुरू झालेला हा सीझन त्यातील हाय-व्होल्टेज ...
या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून संबंधित आरोपींविरुद्ध मारहाण, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, सामूहिक गुन्हेगारी आणि गुंडगिरी यासह लागू होणाऱ्या योग्य त्या कायदेशीर कलमांनुसार गुन्हे दाखल करावेत. तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी पोलिसांना दिले आहेत.
एसटीचे चालक आणि वाहक हे महामंडळाचे केवळ कर्मचारी नसून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या कर्तव्य बजावण्यात अडथळे आणणाऱ्या, त्यांना धमकावणाऱ्या किंवा मारहाण करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याचा धाक बसणे गरजेचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि त्यांच्या पाठीशी महामंडळ प्रत्येक परिस्थितीत ठामपणे उभे राहील, असा स्पष्ट आणि खणखणीत इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या घटनेच्या निमित्ताने दिला आहे. प्रताप सरनाईक हे नेहमीच एसटीचे चालक आणि वाहक यांच्या सोबत असतात, हे आजच्या त्यांच्या कृतीतून समोर आले.