Sunday, November 22, 2026

Agniveer : अग्निवीरांसाठी दिलासादायक निर्णय; दोन वर्षांच्या सेवा मुदतवाढीदरम्यान विवाहाला परवानगी

नोंदणी केलेल्या अग्निवीरांना पाठवण्यात आलेल्या पत्राचा संदर्भ देत सूत्रांनी ही माहिती दिल्याचे वृत्त आहे.

Defence News: अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरती झालेल्या अग्निवीरांना दोन वर्षांच्या सेवा मुदतवाढीदरम्यान विवाह करण्याची परवानगी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यासाठी त्यांना दुसऱ्या ‘टूर ऑफ ड्युटी’दरम्यानचे संक्षिप्त प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करावे लागणार आहे. नोंदणी केलेल्या अग्निवीरांना पाठवण्यात आलेल्या पत्राचा संदर्भ देत सूत्रांनी ही माहिती दिल्याचे वृत्त आहे.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच विवाहाची परवानगी

अग्निपथ योजनेनुसार, भरतीच्या वेळी उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे. तसेच सुरुवातीच्या 4 वर्षांच्या सेवा कालावधीत त्यांना विवाह करता येत नाही. आता दोन वर्षांच्या मुदतवाढीचा पर्याय निवडणाऱ्या अग्निवीरांसाठी या नियमात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दुसऱ्या टप्प्यात प्रवेश घेतल्यानंतर अग्निवीरांना काही काळाच्या विश्रांतीनंतर सुमारे 4 आठवड्यांचे संक्षिप्त प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना विवाह करण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अग्निवीरांना मिळणार दोन वर्षांची मुदतवाढ

2022 मध्ये सुरू झालेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत जवानांची सुरुवातीची सेवा 4 वर्षांची असते. या कालावधीनंतर 25 टक्के अग्निवीरांची गुणवत्तेच्या आधारावर नियमित सेवेसाठी निवड केली जाते. उर्वरित पात्र अग्निवीरांना दोन वर्षांच्या ‘सेकंड टूर ऑफ ड्युटी’चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

भारतीय नौदलाच्या पहिल्या तुकडीने आपला 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलातील पहिल्या तुकड्यांचाही कार्यकाळ लवकरच पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन वर्षांच्या सेवा मुदतवाढीचा पर्याय महत्त्वाचा ठरणार आहे.

सहा वर्षांच्या सेवेनंतर पुन्हा नियमित भरतीची संधी

प्रशिक्षित मनुष्यबळ अधिक काळ सैन्यात उपलब्ध राहावे आणि अनुभवी जवानांना सेवेत कायम ठेवता यावे, या उद्देशाने ‘सेकंड टूर ऑफ ड्युटी’ची संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. या पर्यायातून एकूण 6 वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना नियमित भरतीसाठी आणखी एक संधी मिळणार असल्याचे वृत्त आहे.

संरक्षण दल प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी अग्निपथ योजना अंतिम नसून त्यात वेळोवेळी बदल आणि सुधारणा होत राहतील, असे यापूर्वी स्पष्ट केले होते.

तरुण अग्निवीरांच्या वैयक्तिक आयुष्याचाही विचार

अग्निपथ योजनेत भरती होणाऱ्या तरुणांचे वय साधारण 17.5 ते 21 वर्षे असते. चार वर्षांची सेवा पूर्ण होईपर्यंत त्यांचे वय 21 ते 25 वर्षांच्या दरम्यान असू शकते. अशा परिस्थितीत सेवा मुदतवाढीदरम्यान विवाहाची परवानगी मिळाल्यास अग्निवीरांना वैयक्तिक आयुष्याचे नियोजन करणे सोपे होऊ शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >