Saturday, November 21, 2026

पंतप्रधानांचं सहा महिन्यांपूर्वीचं विधान अखेर खरं ठरलं, सोनं खरेदीबद्दल PM मोदी नेमकं काय म्हणाले होते?

काल, लखनौमध्ये झालेल्या कौशल दीक्षांत समारोहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदीबद्दल भाष्य केलं. मी सहा महिन्यांपूर्वी केलेलं विधान अखेर खरं ठरलं म्हणत देशवासियांचे त्यांनी आभार मानले आहेत.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लखनौमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती, यावेळी त्यांनी सहा महिन्यांपूर्वी केलेल्या सोन्याच्या दराबद्दल भाष्य केले आहे. पंतप्रधानांनी मे 2026 मध्ये देशातील जनतेला आवश्यक असेल तरच सोनं खरेदी करा असं आवाहन केले होतं. त्यांच्या त्याच विधानाची त्यांनी आठवण काल करून देताना लोकांनी सोनं कमी खरेदी केलं म्हणून सोन्याचे दर घसरल्याचा दावा केला. यामुळे देशाच्या पैशांची बचत झाली. त्यांनी लोकांना आणखी एक वर्ष सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. लखनौ येथील कौशल दीक्षांत समारंभात पंतप्रधानांनी असेही सांगितले की, IIT मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांइतकाच आदर ITI मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दिला जाईल.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मला आनंद होत आहे, कारण उत्तर प्रदेशचा खासदार म्हणून, आज देशभरातील माझ्या तरुण सहकाऱ्यांचे स्वागत करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची आणि भाग्याची बाब आहे." पंतप्रधान म्हणाले की, "मी आज सकाळी दिल्लीहून बंगालसाठी निघालो आणि आजच्या दिवसातला माझा पहिला कार्यक्रम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये होता. ज्या उर्जेने, स्वप्नांनी, आशांनी आणि आकांक्षांनी मी IITच्या विद्यार्थ्यांमध्ये गेलो होतो, त्याच उत्साहाने आणि आनंदाने मी आज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) विद्यार्थ्यांमध्ये आलो आहे. IIT असो किंवा ITI, माझ्यासाठी दोन्हीही विद्यार्थी माझ्या देशाची खरी संपत्ती आहेत, तेच माझ्या देशाची क्षमता आहेत आणि तेच माझ्या देशाचे भविष्य आहेत." पंतप्रधान पुढे म्हणाले की, "तुम्ही ITIमध्ये जे शिकलात, ते विकसित भारतासाठी ऊर्जेचा एक प्रमुख स्रोत आहे. हा विकसित भारत तुमच्या कौशल्यातूनच घडवला जाईल. आपल्या देशाने नेहमीच कौशल्यांचा आदर केला आहे."

पुढचे वर्षभर सोनं खरेदी करू नका

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मी सहा महिन्यांपूर्वी, देशातील नागरिकांना अत्यंत आवश्यक असल्याशिवाय वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. मला आनंद आहे की, ज्याप्रमाणे माझ्या देशवासियांनी लाल बहादूर शास्त्रींची एक वेळचे जेवण टाळण्याची विनंती ऐकली होती, त्याचप्रमाणे आजही माझ्या देशाचे चारित्र्य कायम आहे. माझ्यासारख्या एका सामान्य माणसाने कमी सोने खरेदी करण्याची विनंती केल्यावर, माझ्या देशवासियांनी सोनं खरेदी करणं कमी केले आणि सोन्याचे भाव घसरले. आज लोक मला म्हणतात, 'मोदीजी तुमचा सल्ला पाळला म्हणून आमचे पैसे वाचले.'" पुन्हा पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला आणखी एक वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >