Sunday, November 22, 2026

Sanjay Rathod : दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारचे नियोजन; जलसंधारणाच्या कामांना मिळणार वेग- मंत्री संजय राठोड

यासाठी मृद व जलसंधारण विभाग आणि कृषी विभागासह इतर विभागांमध्ये समन्वय साधून कामे केली जाणार आहेत, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

मुंबई : राज्यात एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने जलसंधारणाच्या कामांना वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच 30 जून 2027 पर्यंत जास्तीत जास्त गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी मृद व जलसंधारण विभाग आणि कृषी विभागासह इतर विभागांमध्ये समन्वय साधून कामे केली जाणार आहेत, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

कृषी आणि जलसंधारण विभाग एकत्र काम करणार

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने दोन्ही विभागांमध्ये समन्वय साधण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ग्रामीण भागात थेट शेतकऱ्यांशी जोडलेले असल्याने त्यांच्या सहकार्यामुळे जलसंधारणाच्या कामांचा विस्तार आणि गती वाढण्यास मदत होईल, असे मंत्री राठोड यांनी सांगितले.

हा निर्णय कोणत्याही विभागाच्या कार्यक्षमतेवर अविश्वास व्यक्त करणारा नसून, सामूहिक प्रयत्नांतून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मृद व जलसंधारण, कृषी, ग्रामविकास आणि महसूल विभागासह अन्य यंत्रणांच्या मदतीने ही कामे केली जाणार आहेत.

बंधारे, तलाव आणि नाला बांधांच्या कामांवर भर

राज्यात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, सिमेंट नाला बांध, पाझर तलाव आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार यांसारखी जलसंधारणाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे पावसाचे पाणी साठवणे आणि भूजल पातळी वाढवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

कामांच्या गुणवत्तेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

जलसंधारणाच्या कामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखण्यासाठी शासनाकडून 'जलदर्पण' पोर्टल, MH-UID आणि जिओ-टॅगिंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या प्रणालींचा वापर आणि कामांच्या तांत्रिक प्रक्रियेबाबत कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मृद व जलसंधारण विभागाकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे.

राज्यातील प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे पूर्ण करून संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >