Sunday, November 22, 2026

CHM College: उल्हासनगरचा विकास आराखडा तयार होणार! सिंधी बांधवांना जमिनीचे पट्टे देण्याची प्रक्रिया लवकरच

उल्हासनगर येथे हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट बोर्डच्या चंदीबाई हिंमतमल मनसुखानी (सीएचएम) महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून त्या पदवीसोबत उपयोजित ज्ञान आणि रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करणे आजच्या काळाची गरज आहे.

ठाणे: उल्हासनगर येथे हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट बोर्डच्या चंदीबाई हिंमतमल मनसुखानी (सीएचएम) महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून त्या पदवीसोबत उपयोजित ज्ञान आणि रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करणे आजच्या काळाची गरज आहे. बदलत्या रोजगार बाजारपेठेच्या आणि अर्थव्यवस्थेच्या गरजांनुसार युवकांचे कौशल्य विकसित केल्यास भारत केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळे कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांना सक्षम करण्याचे कार्य शैक्षणिक संस्थांनी करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

देशाच्या फाळणीनंतर सिंधी समाजातील अनेक कुटुंबांना आपली घरे, संपत्ती आणि सर्वस्व मागे सोडून भारतात यावे लागले. उल्हासनगर आणि मुंबईतील चेंबूरसह विविध ठिकाणी हा समाज स्थायिक झाला. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही या समाजाने मेहनत, जिद्द आणि उद्यमशीलतेच्या जोरावर पुन्हा उभारी घेतली. आज देशातील उद्योग, वैद्यकीय, अभियांत्रिकी, सनदी लेखा आणि विविध व्यावसायिक या सारख्या विविध क्षेत्रांमध्ये सिंधी समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच फाळणीनंतर समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांच्या आयुष्याला दिशा मिळावी, या उद्देशाने 1949 मध्ये वांद्रे येथे नॅशनल कॉलेजची स्थापना करण्यात आली. या शैक्षणिक उपक्रमाचा पुढे विस्तार होत एचएसएनसीच्या माध्यमातून आज विविध प्रकारच्या 27 संस्था कार्यरत आहेत. मुंबई विद्यापीठातील सर्वांत मोठे महाविद्यालयही या संस्थेमार्फत चालविले जात असून सुमारे १४ हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

पुढे बोलताना, शिक्षण क्षेत्राकडे केवळ व्यवसाय किंवा पैसा कमावण्याचे साधन म्हणून न पाहता समाजनिर्मितीची व्यवस्था म्हणून पाहण्याची संस्थेची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांमुळे संस्थेचे माजी विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत. संस्थेने निर्माण केलेली ही शैक्षणिक परंपरा आणि वारसा पुढे नेण्याचे काम विश्वस्त, प्राध्यापक आणि प्राचार्य करीत असल्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

शिवाय भारताकडे जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असून या लोकसंख्येला योग्य कौशल्य प्रशिक्षण दिल्यास भारताला जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळ पुरविण्याची मोठी संधी आहे. आजच्या अर्थव्यवस्थेच्या गरजांनुसार मानवी संसाधन विकसित करण्यासाठी कौशल्य विकास महत्त्वाचा आहे. या दृष्टीने सीएचएम संस्थेने सुरू केलेला उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच उल्हासनगर शहराच्या विकासाबाबत बोलताना, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उल्हासनगरचा समावेश मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाच्या व्यापक संकल्पनेत करण्यात आला आहे. शहरात मेट्रोची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून मेट्रोमुळे शहराची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. याशिवाय काँक्रीट रस्ते, उड्डाणपूल आणि स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची योजना यांसारख्या कामांना मान्यता देण्यात आली असून ही कामे सुरू होत आहेत. उल्हासनगर शहराला पुन्हा नियोजनबद्ध शहराचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अनधिकृत ठरलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना अधिकृत करण्यासह क्लस्टर विकासाच्या माध्यमातून शहराचा नियोजनबद्ध व्यापक आराखडा तयार करण्यात येईल, असेही त्यांनी यावली सांगितले.

सिंधी बांधवांना जमिनीचे मालकी हक्क देणार

यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, उल्हासनगरमध्ये स्थायिक झालेल्या सिंधी समाजातील बांधवांना त्यांच्या जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे देणे आणि जमिनी फ्रीहोल्ड करणे याबाबत शासनाने निर्णय घेतल्याचे सांगत या प्रक्रियेची सुरुवात नागपूरपासून करण्यात आली असून लवकरच उल्हासनगरमध्येही ही प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी ग्वाही ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >