Sunday, November 22, 2026

Global Peace Honours 2026 : सचिन तेंडुलकर यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’ पुरस्कार; गेटवे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सन्मान

सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या माध्यमातून आदिवासी आणि वंचित समाजातील मुलांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते काम करत आहेत.

मुंबई : भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना त्यांच्या सामाजिक आणि परोपकारी कार्यासाठी ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवारी रात्री मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या माध्यमातून आदिवासी आणि वंचित समाजातील मुलांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते काम करत आहेत.

खेळांमध्ये मुलींच्या सहभागाला प्रोत्साहन

सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या माध्यमातून फुटबॉल, बास्केटबॉल, कुस्ती, बॉक्सिंग आणि ॲथलेटिक्स यांसारख्या खेळांना प्रोत्साहन दिले जाते. विशेषतः आदिवासी आणि वंचित समाजातील मुलांसह मुलींनाही क्रीडा क्षेत्रात संधी मिळावी, यासाठी फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. या कार्याची दखल घेत तेंडुलकर यांना हा पुरस्कार देण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

अमृता फडणवीस यांनी स्थापन केलेल्या ‘दिव्यज फाउंडेशन’च्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शांतता, धैर्य आणि मानवतेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे, तसेच दहशतवादातील पीडितांना आदरांजली वाहणे हा या वार्षिक कार्यक्रमाचा उद्देश आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी, अमृता फडणवीस आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

फडणवीसांकडून तेंडुलकरांच्या कार्याचे कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन तेंडुलकर यांचे अभिनंदन केले. क्रिकेटमधील त्यांच्या असामान्य कामगिरीसोबतच आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांमधून मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

सचिन तेंडुलकरांकडून 26/11 च्या हुतात्म्यांना श्रद्धांजली

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सचिन तेंडुलकर यांनी अमृता फडणवीस आणि दिव्यज फाउंडेशनचे शांतता आणि सलोख्याचा संदेश देणाऱ्या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. यावेळी त्यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.

या हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखाची जाणीव व्यक्त करत त्यांनी त्यांच्या त्यागाला अभिवादन केले. शांतता आणि सलोखा टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >