Sunday, November 22, 2026

Hyderabad News : हैदराबादमध्ये 2 बॉम्बस्फोटांची धमकी; 300 जणांना ठार मारण्याचा इशारा, पोलीस सतर्क

या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Hyderabad News: लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेच्या नावाने कथितरित्या देण्यात आलेल्या धमकीनंतर हैदराबाद पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरात दोन बॉम्बस्फोट घडवून किमान 300 जणांना ठार मारण्याचा कट असल्याची धमकी एका पत्रातून देण्यात आल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लतीफ भटच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी

हैदराबादमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात या धमकीचा उल्लेख करण्यात आला आहे. हैदराबाद शहर पोलीस सहआयुक्त (विशेष शाखा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्र पाठवणाऱ्याने 18 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील झांगलपोरा येथे झालेल्या चकमकीचा संदर्भ दिला आहे.

या चकमकीत दक्षिण काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी लतीफ भट ठार झाला होता. त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यासारखी घटना घडवण्याची धमकी पत्रात देण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

हॉटेल, रेल्वे स्थानकांसह गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली

या धमकीनंतर काचीगुडा येथील हॉटेल टुरिस्ट प्लाझा आणि काचीगुडा रेल्वे स्थानकासह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हॉटेल्स, रेल्वे आणि बस स्थानके, धार्मिक स्थळे तसेच गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संशयास्पद व्यक्ती, बेवारस वस्तू, वाहने आणि असामान्य हालचालींवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच गस्त वाढवणे, घातपातविरोधी तपासणी करणे आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, धमकीच्या पत्राची सत्यता आणि त्यामागील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांकडून जारी होणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >