Monday, November 23, 2026

बिसलेरीचं पाणी अशुद्ध, बाटलीबंद पाण्यात कर्करोगकारक घटक; FSSAI ची धडक कारवाई

प्रवासात किंवा घरी सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी ज्या बिसलेरीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, त्या पाण्याच्या नमुन्यात संभाव्य कर्करोगकारक घटक आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) बिसलेरी कंपनीविरोधात न्यायालयीन खटला चालवण्याची परवानगी दिली असून, इतर अनेक कंपन्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई: व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पाण्याचे एक वेगळेच स्थान आहे. शुद्ध आणि चांगल्या दर्जाचे पाणी पिण्यासाठी आपण बऱ्याचदा साध्या पाण्याचा वापर न करता 'बिसलेरी'च्या पाण्याचा वापर करतो. पण शुद्ध पाणी समजल्या जाणाऱ्या ह्या 'बिसलेरी'च्या पाण्यामध्ये कर्करोगाचे घटक आढळल्यामुळे FSSAI कडून कारवाई करण्यात आली आहे. पॅकबंद आणि चांगल्या दर्जाचे पाणी म्हणून आपण कायमच 'बिसलेरी'च्या पाण्याला समजतो. पण आता या लोकप्रिय पॅकबंद पाण्याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या नमुन्याची तपासणी केली असता त्यात संभाव्य कर्करोगकारक घटक आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. या गंभीर बाबीची दखल घेत अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) बिसलेरी कंपनीविरोधात न्यायालयात खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बिसलेरीच्या बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा नमुना तपासणीत असुरक्षित आढळला. या तपासणीत पाण्यामध्ये 'ब्रोमेट' (Bromate) या रासायनिक घटकाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळून आले. ब्रोमेट हा संभाव्य कर्करोगजन्य घटक मानला जातो. सुरुवातीच्या निष्कर्षानंतर कंपनीने याविरोधात अपील केले आणि नमुना रेफरल फूड लॅबमध्ये पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला. मात्र, रेफरल लॅबच्या तपासणीतही नमुना असुरक्षित ठरला आणि त्यात 'पॉलीन्यूक्लियर अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स' (PAHs) हे घटक आढळून आले.

दोन्ही चाचण्यांमध्ये पाणी सुरक्षिततेच्या निकषांवर अपयशी ठरल्याने अन्न सुरक्षा कायदा, 2006 अंतर्गत कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. अद्याप कोणता विशिष्ट बॅच किंवा बाटली या नमुन्याशी संबंधित होती याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही, तसेच देशभरातून सर्व साठा मागे घेण्याचे आदेशही जाहीर झालेले नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेत या प्रकरणातील नेमके तपशील, कंपनीची भूमिका आणि पुढील घडामोडी काय होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बिसलेरीसह अन्य पदार्थांवरही कारवाई

दुसरीकडे, अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या इतर आस्थापनांविरोधातही FSSAI ने धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. प्राधिकरणाने उर्मी लाईफ सायन्सेस एलएलपी आणि गौर आयुर्वेदिक स्टोअर यांचे परवाने रद्द केले आहेत. याशिवाय वसंत मसाला, टीआयटी-बीआयटी फुडस इंडिया, मिमान्सा इंडस्ट्रीज आणि आशा कॉन्फेक्शनरी या कंपन्यांविरोधातही खटला चालवण्यास मंजुरी दिली असून, आशा कॉन्फेक्शनरीला पॅकबंद चॉकलेट कुकीजचा साठा मागे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी ऑक्टोबर 2026 च्या अखेरीस सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये बिसलेरीच्या बाटल्यांमध्ये अस्वच्छ किंवा नाल्याचे पाणी भरले जात असल्याचा दावा केला गेला होता. त्या वेळी संबंधित ठिकाण आपला प्लांट नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते. आता FSSAI च्या या कारवाईमुळे पॅकबंद पाण्याच्या गुणवत्तेबाबत आणि तपासणी यंत्रणेच्या भूमिकेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >