'मुंबई पुस्तक महोत्सव' संवेदना आणि माणुसकीचा उत्सव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरात मुंबई पुस्तक महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी सुमारे एक लाख पुस्तकप्रेमींनी महोत्सवाला भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुस्तके ही संवेदना आणि माणुसकी जपणारी माध्यमे असल्याचे सांगितले. ६०० हून अधिक पुस्तक स्टॉल्स आणि १०० हून अधिक सत्रांनी सजलेला हा महोत्सव २९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात तंत्रज्ञानाचा वेग वाढत असला, तरी मानवी संवेदना, प्रेम आणि भावभावना यांची जागा एआय घेऊ शकत नाही. माणसाला संवेदनशील बनवण्याबरोबरच विचार करण्यास प्रवृत्त करण्याचे काम पुस्तके करतात. त्यामुळे मुंबई पुस्तक महोत्सव हा संवेदना आणि माणुसकीचा महोत्सव आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरात मुंबई पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबईत दरवर्षी पुस्तक महोत्सव आयोजित केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.






“समृद्ध समाजाची निर्मिती पुस्तकांमधून होते. समाजातील ज्ञानसंपदेचा विस्तार पुस्तकांनीच केला आहे. आजचे युग कृत्रिम बुद्धिमत्तेचे असले, तरी जीवनातील संवेदना, प्रेम आणि भावना एआयला कळत नाहीत. पुस्तके मात्र माणसाला संवेदनशील बनवतात आणि विचार करण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे हा महोत्सव माझ्यासाठी संवेदना आणि माणुसकीचा उत्सव आहे,” असे फडणवीस म्हणाले.



या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, पोलीस आयुक्त देवेन भारती, महापौर ऋतु तावडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, मुख्य आयोजक अमित साटम, मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते. फडणवीस यांच्या हस्ते श्वेता पांडा यांच्या ‘थोड़ी मय’, हिमांशु गुप्ता यांच्या ‘मेंटल हेल्थ फॉर टीनएजर्स’, पूजा राय यांच्या ‘अमर पुराण’ आणि अमृता बोहरा यांच्या ‘वीर गाथा’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.






“चित्रपट, बॉलिवूड आणि फॅशन फेस्टिव्हलच्या मालिकेत आता मुंबईचा स्वतःचा पुस्तक महोत्सवही आहे,” असे मुख्य आयोजक अमित साटम यांनी सांगितले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याबद्दल आचार्य पवन त्रिपाठी यांनी समाधान व्यक्त केले. या महोत्सवामुळे तरुण पिढीचा स्क्रीन टाइम कमी होऊन वाचनासाठीचा वेळ वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत यांच्या वतीने आयोजित हा महोत्सव २९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ या महोत्सवाचे सहयोगी आहेत. महोत्सवात ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले असून, विविध साहित्यप्रकारांतील आणि भाषांमधील पुस्तकांचा मोठा संग्रह वाचकांसाठी उपलब्ध आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सुमारे एक लाख पुस्तकप्रेमींनी भेट दिली. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही मोठी उपस्थिती होती. बालकांसाठी आयोजित विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.






महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, २५ नोव्हेंबर रोजी उद्योगपती गौतम अदानी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. महोत्सवाच्या कालावधीत १०० हून अधिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यिक संवाद, लेखकांशी चर्चा, पुस्तक प्रकाशन, विविध विषयांवरील प्रदर्शने, बालकांसाठी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे. सर्व वयोगटांमध्ये वाचनाची सवय विकसित करणे आणि पुस्तक संस्कृती अधिक बळकट करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.



या महोत्सवात दिल्लीचे राज्यपाल तरनजीत सिंह संधू, आचार्य प्रशांत, पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक, ॲड. उज्ज्वल निकम, गीतकार मनोज मुंतशिर, चित्रपट दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी, अभिनेत्री व लेखिका शेफाली शाह, अंतराळवीर शुभांशु शुक्ल, अरुणा ढेरे, शशिकांत सावंत, मयूर शाह, राजीव श्रीखंडे, साहित्यिक विश्वास पाटील, शरणकुमार लिंबाळे, अश्विन सांघी, आनंद नीलकंठन, अक्षत गुप्ता, मेधा भास्करन, अंजुम चोप्रा, अंशुल चतुर्वेदी, एहसान वजीर, निकिता ठाकूर आणि प्रफुल्ल बिल्लौरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर वक्ते सहभागी होणार आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भारत-सायप्रस सागरी व्यवसाय मंच; जहाज बांधणी, हरित नौवहनात सहकार्यावर भर

सायप्रस प्रजासत्ताकाच्या नौवहन उपमंत्री मरीना हाजीमानोलिस यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्ताने आज मुंबईत

Mission Pedestrian First: महापालिका आयुक्तांच्या ‘मिशन पेडेस्ट्रियन फर्स्ट’लाच अधिकारीच घालतात खिळ?

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पदपथावरील अतिक्रमण हटवले जाते, पादचारी मुक्त झाले पदपथ बनवले जातात, पण काही दिवसांतच

येत्या गुरुवारी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांत घेतला जाणार 24 तासांचा पाणीब्लॉक, कोणकोणत्या परिसरात बंद असेल पाणी पुरवठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक 1 ते सहार गाव दरम्यान विविध ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांवरील

Safe Parks Safe Cities: उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागांची सुरक्षा वाढवणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): कुर्ला येथील उद्यानानातील तरुण तरुणीला काही अल्पवयीय मुलांकडून झालेल्या मारहाणीच्या

Mumbai Local News : प्रवाशांचा थरकाप: झोपमोड झाल्याचा राग अनावर; प्रवाशाने केसांत लपवलेल्या ब्लेडने केला स्वतःवर हल्ला

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना घडली

Nitesh Rane : मदरसे म्हणजे दहशतवादी घडवणारे अड्डे! मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

कुर्ला मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मदरशांवर बंदीची मागणी मुंबई : कुर्ला येथे एका तरुण-तरुणीला झालेल्या