Wednesday, November 25, 2026

Jalgaon Crime : आधी गाडी अडवली, मग संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकलं; जळगावच्या कुटुंबासोबत नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : रोजगाराच्या शोधात घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबाचा प्रवास मृत्यूच्या सापळ्यात अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील जळगाव येथून गुजरातच्या सुरत जिल्ह्यात कामासाठी निघालेल्या पाटील कुटुंबाला चार जणांनी रस्त्यात अडवून थेट कालव्यात फेकल्याचा आरोप आहे. या घटनेत आई-वडिलांसह तिघांचा मृत्यू झाला असून, १३ वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला आहे. मात्र, कुटुंबातील अन्य दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कामाच्या शोधात निघाले अन् वाटेतच घात झाला

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील हे एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कारखान्यात मजुरीचे काम करत होते. अधिक काम मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करता यावा, या उद्देशाने ते २१ नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबासह गुजरातमधील सुरतच्या दिशेने निघाले होते.

दरम्यान, त्यांचे वाहन सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ पोहोचले असता, दुसऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी पाटील कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने वाहनातून बाहेर काढले आणि जवळच्या कालव्याच्या खोल पाण्यात फेकून दिल्याचा आरोप आहे. हा प्रकार घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

१३ वर्षीय मुलाने पाईप पकडून वाचवला जीव

या घटनेत कुटुंबातील १३ वर्षीय मुलाने प्रसंगावधान राखत कालव्यातील एका पाईपचा आधार घेतला. त्यामुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाण्यापासून त्याचा जीव वाचला. काही वेळानंतर तो कालव्याबाहेर आला आणि मदतीसाठी जवळच्या हॉटेलमध्ये पोहोचला. तिथे त्याने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कालव्यात शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेदरम्यान महुवा तालुक्यातील डुंगरीजवळ कालव्यातून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये एक पुरुष, एक महिला आणि एका तरुणीचा समावेश आहे. नातेवाईकांनी मृतांची ओळख पटवली असून, पुरुषाचे नाव नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील आणि महिलेचे नाव कविता पाटील असल्याचे समोर आले आहे.

दोन मुले अद्याप बेपत्ता, शोधमोहीम सुरू

या घटनेनंतर पाटील कुटुंबातील प्रथमेश पाटील आणि हरीश पाटील ही दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाकडून कालव्याच्या परिसरात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे. दोन्ही मुलांचा शोध लागेपर्यंत ही मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे.

आठ पोलीस पथके आरोपींच्या शोधात

या प्रकरणी बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात खंडियो, अभो, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सुरत ग्रामीण पोलिसांकडून हत्येच्या संशयातून तपास केला जात आहे. आरोपींनी संपूर्ण कुटुंबालाच लक्ष्य का केले ? त्यांचा पाटील कुटुंबाशी आधीपासून काही वाद होता का ? तसेच हा हल्ला पूर्वनियोजित होता का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत.

आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी आठ स्वतंत्र पथके तयार केली आहेत. एकीकडे दोन बेपत्ता मुलांचा शोध सुरू आहे, तर दुसरीकडे आरोपींचा शोध घेऊन या अमानुष कृत्यामागील नेमके कारण उघड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. रोजगाराच्या शोधात निघालेल्या कुटुंबावर ओढवलेल्या या संकटाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा