मुंबई : "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाची घळभरणी लवकरच करण्यात येणार असून, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत", अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिली.
मंत्री राणे म्हणाले, नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या आढावा बैठकीत प्रकल्पग्रस्तांना नियमानुसार नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रकल्पाच्या कामातील अडथळे दूर करून कामाला गती देण्यासह पुनर्वसनस्थळी आवश्यक असलेल्या १८ नागरी सुविधा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव जयंत बोरकर, ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव नारायण कराड, ग्रामविकास विभागाच्या सचिव कविता पोद्दार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, मुंबईतील मरोळ येथे प्रस्तावित आधुनिक मासळी बाजारपेठेच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून आधुनिक, सुसज्ज आणि आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त बाजारपेठ विकसित करण्यासाठी कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माढा तालुक्यातील भीमनगर-रांजणी, तसेच पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली आणि देवगाव येथे मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत आधुनिक मासळी बाजारपेठ उभारण्याचे प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले. या तिन्ही बाजारपेठांचे सुसज्ज स्वरूपातील आराखडे तयार करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला आमदार अभिजित पाटील, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण आणि मामा तलावांमधील मत्स्यव्यवसाय वाढविण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. तलावांमधील मत्स्य उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत गोसेखुर्द धरण आणि मामा तलावांतील मत्स्यव्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासही सांगण्यात आले. या बैठकीला आमदार नरेंद्र भोंडेकर, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे आणि भंडाराचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
दरम्यान, पनवेल येथील एकविरा आई मासळी बाजार कोळी महिला संस्थेने कोळी समाजाच्या पारंपरिक सण-उत्सवांचे जतन आणि सुरक्षित आयोजन, तसेच मासेमारी व्यवसायाशी संबंधित बंदरांवरील धक्क्यांच्या सुविधा व पायाभूत कामे मार्गी लावण्याबाबत मंत्री नितेश राणे यांना निवेदन दिले. कोळी समाजाची संस्कृती, परंपरा आणि मासेमारी व्यवसायाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी शासन मच्छीमारांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन राणे यांनी दिले.