Wednesday, November 25, 2026

Yogi Adityanath : "कमळ हेच आमचे सर्वस्व; मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, हे सर्वांनाच माहीत आहे" : योगी आदित्यनाथ यांचे ठाम वक्तव्य

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी वेगळी मांडणी केली होती. निवडणूक काळात 'कमळ' हेच भाजपचा चेहरा असते, असे ते म्हणाले होते. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि नवीन आमदार निवडून आल्यानंतर एक बैठक घेतली जाते.

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून सुरू असलेल्या चर्चांना योगींचे उत्तर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील पुढील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, हे कोणापासूनही लपलेले नाही आणि सर्वांनाच ठाऊक आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांनी बुधवारी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी 'कमळ' हेच पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि खरा चेहरा असल्याचे म्हटले होते; त्या पार्श्वभूमीवर योगींनी आपली भूमिका मांडली. पुढे ते म्हणाले की, प्रत्येक उमेदवाराला 'कमळ' या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागणार आहे आणि मीदेखील कमळाच्याच चिन्हावर लढणार आहे. आमच्यासाठी कमळाचे फूलच सर्वकाही आहे. मौर्य यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल हे सर्वांनाच माहीत असल्याचे सांगत त्यांनी या विषयावरील चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

केशव प्रसाद मौर्य यांनी काय भूमिका मांडली होती ?

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी वेगळी मांडणी केली होती. निवडणूक काळात 'कमळ' हेच भाजपचा चेहरा असते, असे ते म्हणाले होते. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि नवीन आमदार निवडून आल्यानंतर एक बैठक घेतली जाते. या बैठकीत केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्वांच्या सहमतीने नेत्याची निवड होते, असे मौर्य यांनी स्पष्ट केले. सध्या योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत; मात्र पुढे तेच या पदावर कायम राहतील की दुसऱ्या कोणाची निवड होईल, हे ठरवण्याचा अधिकार माझा नसून निवडून आलेले आमदारच तो निर्णय घेतील, असेही ते म्हणाले होते. उल्लेखनीय म्हणजे, आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपने अद्याप मुख्यमंत्रिपदाच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही.

ब्रजेश पाठक यांचा एकजुटीचा संदेश

याच संदर्भात दुसरे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी पक्षाच्या एकजुटीवर भर दिला आहे. उत्तर प्रदेशात सलग तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आणण्यासाठी मोठा जनादेश कसा मिळवता येईल, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. राज्यातील विविध समाजातील नेत्यांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्धार केला असून, भाजपला पुन्हा एकदा भक्कम बहुमताने विजयी करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करत असल्याचे पाठक यांनी सांगितले.

२०२७ च्या निवडणुकीची संभाव्य समीकरणे

उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी, म्हणजेच २०२७ च्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१७ पासून राज्यात भाजपने सलग दोन वेळा सत्ता मिळवली आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा सत्ता राखून विजयाची हॅट्ट्रिक करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. दुसरीकडे, समाजवादी पक्ष (सपा) देखील या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याची तयारी करत असल्याने आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >