Thursday, November 26, 2026

आता AI स्वतःहून करणार तुमची कामं ! फोन-लॅपटॉप बंद असतानाही Claude Duet राहणार अ‍ॅक्टिव्ह

हा AI केवळ तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही, तर तुम्ही उपलब्ध नसतानाही स्वतःहून कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

समजा, तुम्ही ऑफिसच्या कामातून ब्रेक घेतला आहे, बाहेर फिरायला गेला आहात किंवा तुमचा फोन आणि लॅपटॉपही बंद आहे... पण तरीही तुमची महत्त्वाची कामं सुरूच आहेत! ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटतंय ना ? मात्र, आता AI च्या मदतीने हे शक्य होणार आहे. कारण AI क्षेत्रातील आघाडीची कंपनी Anthropic ने भारतात Claude Duet नावाचा एक नवा स्मार्ट AI एजंट लॉन्च केला आहे.

विशेष म्हणजे, हा AI केवळ तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही, तर तुम्ही उपलब्ध नसतानाही स्वतःहून कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. Anthropic च्या मते, Claude Duet विशेषतः दिवसभर अनेक कामांचा ताण सांभाळणाऱ्या प्रोफेशनल्स, स्टार्टअप फाउंडर्स, कन्सल्टंट्स आणि छोट्या व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आला आहे. हा एजंट Claude Opus 5.5 मॉडेलवर काम करतो.

नेमकं काय काम करणार Claude Duet ?

Claude Duet तुमच्या दैनंदिन कामांवर लक्ष ठेवून गरजेनुसार स्वतःहून अ‍ॅक्शन घेऊ शकतो. सकाळी दिवसातील महत्त्वाच्या कामांची माहिती देण्यापासून ते ईमेल तपासणे, महत्त्वाचे मेसेज शोधणे आणि मीटिंगच्या वेळांमधील गोंधळ ओळखण्यापर्यंत अनेक कामं हा AI करू शकतो. एवढंच नाही, तर डॅशबोर्ड तयार करणे, आर्थिक अंदाजपत्रक बनवणे आणि वेगवेगळ्या अ‍ॅप्समधून माहिती गोळा करून ती व्यवस्थित मांडणे, अशा कामांमध्येही तो मदत करू शकतो.

फोन आणि लॅपटॉप बंद, तरी AI कामावर

Claude Duet चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची बॅकग्राउंडमध्ये काम करण्याची क्षमता. सामान्य AI चॅटबॉटप्रमाणे सतत स्क्रीनवर राहण्याची त्याला गरज नाही. स्वतःच्या व्हर्च्युअल मशीनवर काम करत असल्यामुळे फोन किंवा लॅपटॉप बंद असतानाही तो दिलेली कामं सुरू ठेवू शकतो. यासाठी यूजर टेक्स्ट किंवा व्हॉइसच्या माध्यमातून सूचना देऊ शकतात. एखादं काम पूर्ण झाल्यानंतर किंवा पुढील प्रक्रियेसाठी यूजरच्या परवानगीची गरज भासल्यास हा AI नोटिफिकेशन पाठवतो.

भारतीय भाषांमध्येही उपलब्ध; किती असेल किंमत ?

Claude Duet अँड्रॉइड, आयओएस आणि claude.ai या वेबसाइटवर उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू आणि गुजराती यांसारख्या भारतीय भाषांसह Claude मध्ये उपलब्ध असलेल्या 35 भाषांना तो सपोर्ट करतो. सध्या यासाठी स्वतंत्र सबस्क्रिप्शन प्लॅन जाहीर करण्यात आलेला नाही. पात्र Claude प्लॅन असलेले यूजर्स त्याचा वापर करू शकतात. मात्र, त्याचा वापर सामान्य Claude संभाषणाच्या मर्यादेतच मोजला जाणार आहे.

काही मर्यादाही आहेत

अर्थात, या नव्या AI एजंटमध्ये काही त्रुटीही आहेत. कधी कधी संभाषणाचा अर्थ समजून घेण्यात किंवा महत्त्वाची कामं ओळखण्यात त्याच्याकडून चुका होऊ शकतात. सध्या वैयक्तिक कामांपेक्षा ऑफिसशी संबंधित कामांमध्ये त्याची कामगिरी अधिक चांगली असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. तसेच, AI काम करत असताना त्याचा ब्राउझर यूजरला लाईव्ह पाहता येत नाही. एकंदरीत, AI आता केवळ प्रश्नांची उत्तरं देण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर स्वतःहून कामं पूर्ण करणाऱ्या डिजिटल असिस्टंटच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे भविष्यात ऑफिसमधील कामांची पद्धतच बदलण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >