Friday, November 27, 2026

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा मेगाप्लॅन ! मनमाड-इगतपुरी मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा

सिंहस्थ कुंभमेळ्यात रेल्वेने सुमारे तीन कोटी भाविकांची वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील देवळाली, नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच प्रमुख रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधांचे बळकटीकरण केले जात आहे.

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने नाशिक परिसरातील रेल्वे स्थानकांच्या विकासाला वेग दिला आहे. कुंभमेळ्यादरम्यान देशभरातून कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याने रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी सुविधांचा विस्तार आणि रेल्वे वाहतूक क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून मनमाड-इगतपुरी रेल्वे मार्गावर स्वयंचलित सिग्नल प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या यंत्रणेमुळे मनमाड ते मुंबईदरम्यानच्या अतिव्यस्त रेल्वे मार्गावरील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

 पाच रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

सिंहस्थ कुंभमेळ्यात रेल्वेने सुमारे तीन कोटी भाविकांची वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील देवळाली, नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच प्रमुख रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधांचे बळकटीकरण केले जात आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन स्थानकांवरील सुविधा अधिक सक्षम करण्याचे काम मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून सुरू आहे.

 दररोज धावणार १५० हून अधिक विशेष रेल्वेगाड्या ?

कुंभमेळ्याच्या मुख्य पर्वणीच्या काळात भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या नियोजनानुसार, प्रत्येक अमृतस्नानाच्या आसपासच्या चार दिवसांत देशाच्या विविध भागांतून दररोज १५० हून अधिक कुंभ विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची योजना आहे. यामध्ये उत्तर भारतातून ७५ आणि दक्षिण भारतातून ७५ गाड्या चालवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभागण्यास आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.

स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम अंतिम टप्प्यात

मनमाड-इगतपुरी रेल्वे मार्गावरील स्वयंचलित सिग्नल प्रणालीचे कामही वेगाने सुरू आहे. भुसावळ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खेरवाडी आणि कसबे सुकेणे रेल्वे स्थानकांवरील काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. तर नाशिक रोड स्थानकातील ८० टक्के, देवळालीतील ६८ टक्के आणि ओढा स्थानकातील ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, निफाड-कसबे सुकेणे-खेरवाडी या मार्गावर ३० सप्टेंबर २०२६ रोजी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर मनमाड-इगतपुरी संपूर्ण रेल्वे मार्गावर ही आधुनिक प्रणाली सुरू होणार आहे.

रेल्वे वाहतुकीचा वेग आणि सुरक्षितता वाढणार

स्वयंचलित सिग्नल प्रणालीमुळे रेल्वे मार्गाची वाहतूक क्षमता वाढणार आहे. या आधुनिक यंत्रणेमुळे दोन रेल्वेगाड्यांमधील सुरक्षित अंतराचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. परिणामी, एकाच मार्गावर कमी वेळेत अधिक रेल्वेगाड्या चालवणे शक्य होईल. याशिवाय सिग्नलसाठी रेल्वेगाड्यांना वारंवार थांबावे लागण्याचे प्रमाण कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होईल. मानवी चुकांची शक्यता कमी झाल्याने प्रवासी आणि मालवाहतुकीची सुरक्षितताही वाढणार आहे. मालगाड्यांची वाहतूक अधिक वेगाने होऊ शकल्यास औद्योगिक क्षेत्रालाही त्याचा फायदा मिळेल.

एकूणच, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून सुरू असलेली ही कामे नाशिकच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाची ठरणार आहेत. कुंभमेळ्यादरम्यान भाविकांची संभाव्य गर्दी हाताळण्यासोबतच भविष्यातील रेल्वे वाहतुकीसाठीही या सुविधांचा फायदा होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >